सोयाबीन उत्पादक : शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळले, सणांवर पडले विरजणमारेगाव : यावर्षी शेतीला पावसाने दगा दिल्याने सोयाबीनला अत्यल्प एकरी एक ते दोन पोते उतारी आली आहे. सोयाबीनच्या पिकाची उतारी बघून आता वर्षभर जगावे कसे, या विचाराने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनच्या मिळणाऱ्या उतारीने व कमी भावाने शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकावरचा विश्वासच उडाला आहे.यावर्षी शेती हंगामाच्या सुरूवातीला मृग नक्षत्र चांगले बरसल्याने कापूस व सोयाबीन पिकाच्या पेरण्या साधल्या होत्या. मात्र त्यानंतर पावसाने दगा दिला. सोयाबीनचे पीक ऐन शेंगा भरण्याच्या काळात असतानाच पावसाने दगा दिल्याने सोयाबीनचे पीक सुकून गेले आणि शेंगामधील दाणा झिरमीटला. त्यामुळे आता सोयाबीन काढताना एकरी एक ते दोन पोत्याची उतारी मिळत आहे. सोयाबीन पिकाला मिळणारी उतारी बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक नियोजन ढासळून गेले आहे. सोयाबीनच्या कापणीसाठी मजूर एकरी एक हजार ५०० ते एक हजार ६०० रूपये घेतात. यंत्राने सोयाबीन काढासाठी लागणारा खर्च वेगळाच असतो. त्यामुळे सोयाबीनच्या कापणीला व काढणीला लागणारा खर्चही निघत नसल्याने काही शेतकरी उभे पीक पेटवून देत आहे. गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन पिकाच्या उतारीत घट आल्याने आणि पिकाच्या उत्पादनातून भांडवली खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्याचा आता सोयाबीन पिकावरचा विश्वासच उडून गेला आहे.पाण्याच्या कमतरतेने सोयाबीनचे पीक करपून गेल्याने पिकांची वाढ खुंटली. त्यामुळे सोयाबीनपासून मिळणारे कुटारही यावर्षी अत्यल्प आहे. सोयाबीनच्या कुटाराचा चारा म्हणून शेतकऱ्यांना वर्षभर उपयोग होत होता. परंतु पिकाची वाढ न झाल्याने आणि शेंगा न लागल्याने, आता सोयाबीनपासून कुटारही न मिळाल्यातच जमा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या घरात सणांवरही विरजण पडणार आहे. त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)
अल्प उतारीने शेतकरी चिंतेत
By admin | Updated: October 11, 2015 00:42 IST