मांगलादेवी येथील प्रकार : वीज वितरणच्या अनागोंदीने उद्रेकविनोद कापसे■ मांगलादेवीवीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांचा गुरुवारी मांगलादेवी येथे उद्रेक झाला. दोन अभियंत्यासह कर्मचार्यांना चक्क कार्यालयातच डांबले. पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर अभियंते आणि कर्मचार्यांना बाहेर काढण्यात आले. या प्रकाराने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे आठ गावांचा कारभार पाहण्यासाठी वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून येथील कारभार ढेपाळला आहे. वीज वितरणच्या गलथान कारभाराने शेषराव ढेंगे या शेतकर्याला आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही वीज वितरणच्या कामकाजात सुधारणा झाली नाही. उलट मांगलादेवी परिसरात भारनियमनाव्यतिरिक्त अधिकचे भारनियमन करण्यात येते. वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. कमी दाबाच्या वीज पुरवठय़ाने पंखेही फिरत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. येथील रोहित्राची स्थितीही दयनीय आहे. साधी वार्याची झुळूक आली तरी तासन्तास वीज पुरवठा खंडित असतो. या परिस्थितीमुळे गावकर्यांना १५ दिवसातून एकदा पाणी मिळते. या प्रकाराची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली. सहायक अभियंता सतीश कानडे यांनी वारंवार कनिष्ठ अभियंता जितेंद्र राऊत यांना सूचना दिल्या. परंतु त्यांचेही ऐकले नाही. शेवटी सहायक अभियंता सतीश कानडे स्वत: गुरुवारी मांगलादेवी येथे आले. हा प्रकार गावकर्यांना माहीत झाला. गावकरीही त्या ठिकाणी उपस्थित झाले. कनिष्ठ अभियंता जितेंद्र राऊत यांनी गावकर्यासमोरच माझी बदली करा, मला येथे काम करायचे नाही, असे अधिकार्याला ठणकावून सांगितले. त्यामुळे गावकरी संतप्त झाले. काही कळायच्या आतच गावकर्यांनी दोन अभियंते आणि कार्यालयात उपस्थित कर्मचार्यांना आतमध्ये डांबले. जोपर्यंत यवतमाळवरून कार्यकारी अभियंता येणार नाही तोपर्यंत दार उघडणार नाही, अशी भूमिका घेतली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. संपूर्ण गाव वीज वितरणच्या कार्यालयासमोर उपस्थित झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसत होती. शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले. दारव्हाचे ठाणेदार सदानंद मानकर, नेरचे उपनिरीक्षक युनुस शेख, जमादार राजेश चौधरी आदींनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर उपकार्यकारी अभियंता भगिरथ साहू, कार्यकारी अभियंता पी.बी. पाठक यांनी नागरिकांची समजूत काढली. लवकरच परिस्थिती सुधारण्याची ग्वाही दिली. त्यामुळे नागरिक शांत झाले. शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे दार उघडले. नागरिकांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्याने सर्वत्र खळबळ उडाली.
दोन अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांना डांबले
By admin | Updated: May 9, 2014 01:35 IST