पांढरकवड्यात आयोजन : शिवरामजी मोघे महाविद्यालयात विविध विषयांवर चर्चासत्रपांढरकवडा : येथील शिवरामजी मोघे महाविद्यालयात वाणिज्य आणि अर्थशास्त्र या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. या राष्ट्रीय परिषदेत बदलत्या चलनव्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनीय भाषणातून त्यांनी अर्थव्यवस्थेच्या आर्थिक मजबुतीकरणासाठी बदलत्या चलनव्यवस्थेची भूमिका विषद करत जागतिक पातळीवर त्याची परिणामकारकता स्पष्ट केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शंकर वऱ्हाटे यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रीय परिषदेची भूमिका विषद केली. प्रमुख पाहुणे विजय मोघे यांनी या आदिवासीबहुल भागात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. हैद्राबाद येथील व्ही.व्ही.महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.प्रसन्ना खडकीकर यांनी बीजभाषणातून चलनी नोटांच्या स्थितीगतीचा आढावा घेतला. यावेळी जगदंबा संस्थानचे अध्यक्ष वामन सिडाम व मदन जिड्डेवार प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात माई रोही यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचित्र देऊन सत्कार करण्यात आला. या परिषदेसाठी महाराष्ट्रासह विविध राज्यातील प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग दर्शविला. परिषदेसाठी विविध राज्यातील तब्बल ११० शोधनिबंध प्राप्त झाले. परिषदेचे आयोजन सचिव डॉ.राधेश्याम चौधरी यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय परिषदेची रुपरेषा सांगितली. संचालन डॉ.प्रदिप झिलपिलवार व प्रा.नितीन वासनिक यांनी केले तर डॉ.अरुण दसोडे यांनी आभार मानले. परिषदेच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष डॉ.निवृत्ती पिस्तुलकर होते, तर दुसरे सत्र डॉ.अशोक चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या दोनही सत्रात शोधनिबंधक वाचकांनी वाणिज्य आणि अर्थशास्त्रातील विविध विषयावरचे शोधनिबंध सादर करुन सविस्तर चर्चा घडवून आणली. समारोपीय कार्यक्रमात डॉ.महादेव रिठे व डॉ.विजयालक्ष्मी नेम्मानीवार यांनी परिषदेचा आढावा घेतला. यावेळी डॉ.किशोर गोमेकर, डॉ.अरुण दसोडे उपस्थित होते. संचालन प्रा.नितीन वासनिक यांनी केले, तर आभार डॉ.अरुणा चुडासामा यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
राष्ट्रीय परिषदेत बदलत्या चलन व्यवस्थेवर चर्चा
By admin | Updated: March 24, 2017 02:17 IST