पुसद : प्रचंड मेहनत करुनही शेतीतून काही उरत नाही. उलट शेतकर्यांवर कर्जाचा डोंगरच वाढत जातो. मात्र अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी एका शेतकर्यांन दुग्ध व्यवसायाची कास धरली. दत्ता पुलाते असे या शेतकर्याचे नाव असून तो तालुक्यातील हेगडी येथील रहिवाशी आहे. अल्प शिक्षित दत्ताने दुग्धोत्पादन सुरू करून शिक्षित तरुणांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला.जेमतेम पाचवीपर्यंतत शिक्षण झालेले दत्ता कान्हूजी पुलाते हेगडी या गावचा रहिवासी. घरची स्थिती हलाखीची असल्यामुळे त्याला पाचवीपर्यंतच शिक्षण घेता आले. सुरुवातीला रोजमजुरी केली. रोजमजूरीतून काही शिल्लक ठेवून काही पैसा जमा केला. त्या पैशातून त्याने एक म्हैस खरेदी केली. पाच लिटर दूध दररोज निघत होते. त्या दुधाची विक्री करून सहा महिन्यात दत्तरावने दुसरी म्हैस खरेदी केली. दुधाचा धंदा सुरू केला तरी रोजमजुरी काही सोडली नाही. वडिलोपार्जीत सव्वा एकर शेती होती ती कर्जात गेली होती. त्या कर्जाची परतफेड करुन शेती मालकीची केली. १६ वर्षांपूर्वी दुधाचा धंदा सुरु केला तेव्हा दत्तरावकडे एक म्हैस होती. आज त्याच्या जवळ नऊ म्हशी आहे. दत्तराव रोज पहाटे पाच वाजता उठून म्हशीचे दुध काढतो. या कामी त्याला त्याची पत्नी नंदाबाई हातभार लावते. सुरुवातीच्या काळात तो पहाटेच सायकलने दूध विकायला पुसदला जात असे. आज दोन पैसे जमा झाल्याने सायकलवरून दुचाकीवर आला. या गाडीने तो आता पुसद शहरातील ३५ घरी रोज तीस लिटरच्यावर दूध वाटप करतो. या कामी त्याला तासापेक्षा अधिक वेळ लागतो. दूध वाटप केल्यानंतर तो गावाकडे जातो आणि आपल्या शेतातील कामात रमतो. दुग्ध व्यवसायात मेहनत फार आहे. यातून तरुणांना रोजगार मिळू शकतो, असे दत्ता पुलाते यांनी सांगितले. दुधासोबत शेणखत मिळत असल्याने शेतात भरपूर पीक होते. यामुळे शेतीला हा व्यवसाय पूरक आहे. दुग्ध व्यवसायात शेती कर्जमुक्त करून त्यात वाढ करून आज पाच एकर शेती त्यांचे नावे आहे. त्याचबरोबर घरी छोटेसे का होईना किराणा दुकान पण टाकले आहे. पहिले झोपडी होती आज पक्के घर बांधले आहे. आज शेतकरी आत्महत्या करीत असताना दत्ता पुलातेसारखा जिद्दी व मेहनती शेतकर्याने दूध व्यवसायाच्या भरोश्यावर सव्वा एकरची शेती पाच एकर केली. त्याचबरोबर घराला घरपण आणले. दुग्ध व्यवसायच नव्हे तर कोणतेही काम तरुणांनी मन लावून केल्यास कुठल्याही क्षेत्रातत तो यशस्वी होऊ शकतो, असे दत्ता पुलाते आत्मविश्वासाने सांगतो.आज दत्ताची ही यशोगाथा तालुक्यात आदर्श असून अनेक शेतकरी त्याचे अनुकरण करुन दुग्ध व्यवसायाकडे वळत आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत असताना दत्तासारखा शेतकरी मात्र या शेतकर्यांना प्रकाशाची वाट दाखवित आहे. त्याचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी आहे. (तालुका प्रतिनिधी)
दुग्ध व्यवसायातून दत्ताने शोधला प्रगतीचा मार्ग
By admin | Updated: May 9, 2014 01:32 IST