पुसद : नवीन सरकारी दप्तर आणि वाईनबारचा सहा महिन्यांच्या थकीत हप्तेखोरीपोटी ३0 हजाराची मागणी करणार्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षकाविरुद्ध लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुसद शहर पोलिसांनी यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविला. माधव रघुनाथराव तेलंगे असे गुन्हा नोंद झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुसद उपविभागाचे निरीक्षक पद रिक्त असल्याने माधव तेलंगे यांच्याकडेच प्रभारी निरीक्षकाचा पदभार होता. उमरखेड येथे शैलेश जयस्वाल यांचे दोन परवानाकृत वाईनबार आहे. दारूविक्री आणि शिल्लक साठा यांचा लेखाजोखा ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क कार्यालयाकडून सरकारी दप्तर घ्यावे लागते. शैलेश जयस्वाल यांच्याकडील सरकारी दप्तर संपल्याने त्यांनी प्रभारी निरीक्षक तेलंगे यांच्याकडे दप्तराची मागणी केली. तेव्हा दप्तर देण्यास नकार देऊन प्रभारी निरीक्षक तेलंगे यांनी वाईनबारच्या हप्त्याची गेल्या सहा महिन्यांची थकबाकी आणि दप्तरापोटी ३0 हजार रुपयांची मागणी जयस्वाल यांच्याकडे केली. जयस्वाल यांनी मागणीला होकार दिला. त्यानंतर १५ एप्रिलला यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून एसीबीचे उपअधिक्षक सतीश देशमुख यांनी दोन सरकारी पंचासमक्ष लाचेच्या मागणीची १९ एप्रिलला पडताळणी केली. त्यामध्ये मागणीची खात्री पटली. त्यानंतर पुसद येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात एसीबीच्या पथकाने सापळा रचला. मात्र प्रभारी निरीक्षक तेलंगे यांना कुणकुण लागली. त्यामुळे त्यांनी लाच स्विकारण्यास नकार दिला. सापळा अपयशी ठरल्याने अखेर यवतमाळच्या लाचलुचपत विभागाने प्रभारी निरीक्षक तेलंगे यांच्यावर लाचेच्या मागणीचा ठपका ठेवला. तसेच पुसद शहर पोलिसात याप्रकरणी तक्रार देऊन तेलंगे यांच्या विरुद्ध लाचेच्या मागणीचा गुन्हा नोंदविला. याची कुणकुण लागताच प्रभारी निरीक्षक तेलंगे हे पसार झाले आहेत. जामीन मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूअसल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)
एक्साईजच्या उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: May 9, 2014 01:32 IST