वणी : शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये यावर्षी काही जिल्हा परिषद शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले़ मात्र या वर्गांना अतिरिक्त शिक्षक अजूनही देण्यात आले नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ पालकांनाही पश्चाताप होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे़शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये प्राथमिक स्तरावरील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना एक किलोमीटरच्या आत, तर आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना घरापासून तीन किलोमीटरच्या आत, शिक्षण उपलब्ध करून देणे शासनाची जबाबदारी आहे़ त्यामुळे यावर्षी या अधिनियमाचा अवलंब करून चार किलोमीटरपर्यंत शाळा असणाऱ्या काही शाळांमध्ये पाचवीचे वर्ग व सातवीपर्यंत शाळा असणाऱ्या काही जिल्हा परिषद शाळांमध्ये आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे.पालकांनी आपल्या गावातच शिक्षण उपलब्ध झाल्याने आपल्या पाल्यांना गावातीलच शाळेतच टाकले़ यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांची पायपीट तर वाचली, परंतु त्यांना शिकवणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ पाचवीच्या वर्ग उघडलेल्या शाळेत स्वतंत्र वर्गासाठी शिक्षक देणे गरजेचे असतानाही विद्यार्थी पटसंख्येअभावी शिक्षक देता आले नाही़ त्यामुळे जुन्याच कार्यरत शिक्षकांवर आणखी एका वर्गाचा बोजा पडला आहे. तसेच आठव्या वर्गाला इंग्रजी विषयाचे अध्यापन करण्यासाठी पदवीधर शिक्षकाची तसेच विज्ञान व गणित विषय शिकविण्यासाठी प्रशिक्षित विज्ञान पदवीधर शिक्षकाची नियुक्ती होणे आवश्यक होते़ मात्र तसेही झालेच नाहीे.बारावी, डी़एड़ झालेले शिक्षक आठव्या वर्गाला विज्ञान व गणित विषय शिकवू शकतच नाही़ त्यातच जिल्हा परिषदेकडे विज्ञान पदवीधर शिक्षकाची वाणवा आहे़ मग या वाढलेल्या आठव्या वर्गांना शिक्षक देणार कोठून? त्यामुळे विद्यार्थ्यांची इंग्रजी, विज्ञान व गणिताची पाटी कोरीच राहण्याची शक्यता बळावली आहे़ जिल्हा परिषद शाळेत विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध नाहीत, तर मग विद्यार्थी प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान शिकणार कसे, हाही चिंतनीय प्रश्न निर्माण होत आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)
वर्ग दिले, शिक्षकच नाही
By admin | Updated: December 18, 2014 02:25 IST