पांढरकवडा : मागील दीड महिन्यापासून येथील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे़ या दीड महिन्याच्या कालावधीत संपूर्ण पोलीस ठाण्याचा कारभार अस्ताव्यस्त झाला असून कोणाचा पायपोस कोणाला नाही, अशी या पोलीस ठाण्याची अवस्था झाली आहे़तत्कालीन ठाणेदार अशोक बागुल यांची येथून बदली होऊन तब्बल दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. बागुल यांची बदली झाल्यानंतर नेहमीप्रमाणे लगेच नवीन ठाणेदारांची या ठिकाणी नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती़ तथापि दीड महिन्यानंतरही या ठिकाणी नवीन ठाणेदारांची अद्याप नियुक्ती झाली नाही़ तेव्हापासून येथील कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरु आहे़ गृह खात्याने अद्यापही नवीन ठाणेदाराची नियुक्ती केली नाही़ परिणामी पोलीस ठाण्याचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे़ शहर तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावांमध्ये अवैध व्यवसायांनी डोके वर काढले आहे़ गुन्ह्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे़ अवैध व्यावसायीकांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही़ जागोजागी मटका, जुगार अड्डे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे़ राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळखुटी, पाटणबोरीपासून तर करंजीपर्यंत अवैध व्यवसायांना अक्षरश: उधाण आले आहे़ पोलिसांच्या नाकावर टिच्चून गावागावात अवैध व्यावसायीकांनी आपापले अड्डे सुरु केले आहे़ त्यामुळे सामान्य नागरिक वैतागले आहेत़करंजी येथे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे कोणीही लक्ष देत नाही़ मोठ्या प्रमाणावर महिला एकत्र येऊन त्यांनी हे अवेध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी केली़ रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला़ परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही़ या अड्ड्यांवर धाडी मारण्याचे केवळ नाटक केले जाते, असा सुज्ञ नागरिकांचा स्पष्ट आरोप आहे़ धाड मारल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हे अड्डे पूर्ववत सुरु होतातच कसे, हा संशोधनाचा विषय आहे़वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचेही याकडे सतत दुर्लक्ष होत आहे़ अवैध व्यासायीकांवर कुणाचाच वचक नसल्यामुळे अवैध धंद्यांमध्ये सतत वाढ होत आहे़ शहराच्या चोरमंडी परिसरात, मेन लाईनमध्ये, ओम टॉकीज परिसर व ठाण्याच्या जवळच बसस्थानक परिसरात खुलेआमपणे जुगार, मटका, ताजी वरली आदी व्यवसाय सुरू आहे. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे़ यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तालुक्यात येते, या अड्ड्यांवर धाड मारते, लाखो रूपयांचा जुगार हजारात दाखविते, अन् हे पथक गेल्यानंतर पुन्हा अड्डे सुरू होतात़ हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे़ त्यामुळे या अड्ड्याव्ांर केवळ धाड मारल्याचे नाटक केले जाते, असा नागरिकांचा समज झाला आहे. तो दूर करण्याची जबबादारी पोलिसांवरच आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
पोलीस ठाण्याचा कारभार प्रभारावर
By admin | Updated: May 11, 2015 01:51 IST