यवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना सत्तेचा ५० टक्के वाटा देण्यात आला आहे. त्याउपरही बऱ्याच महिला नगरसेवकांसह पुरूष नगरसेवकांनाही प्रशासकीय कामकाजाची माहितीच राहत नाही. या नगरसेवकांची क्षमता बांधणी करण्यासाठी नगरविकास विभागाने विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील तज्ज्ञांकडून वेगवेगळ््या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी आयोजित कार्यशाळा येथील प्रशासकीय इमारतीत २३ ते २४ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणार आहे. कार्यशाळेला विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम कायदा १९६५ मध्ये कलमान्वये नगरसेवकांची भूमिका व त्यांच्या जबाबदाऱ्या या विषयावर कल्याण केळकर मार्गदर्शन करणार आहेत. सेवादर्जा मानांकण आणि मूल्यांकण या विषयावर सुरेश पाटणकर, नगरपालिकांचे अंदाजपत्रक, जंडर बजेटिंग व वित्त व्यवस्थापन यावर प्रशांत पिसाळकर मार्गदर्शन करणार आहेत. नगरपरिषदेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणे, त्यासाठी विविध प्रकल्पांची अंमलबजावणी करणे याबाबत प्रशांत पिसोळकर मार्गदर्शन करणार आहेत. शेवटच्या दिवशी सभाशास्त्र व सभागृहातील कामकाजांचे नियम सांगण्यात येणार आहे. शहर स्वच्छता आराखडा बनविणे, त्यासंबंधी केंद्र व राज्य सरकारची धोरणे याची माहिती दिली जाणार आहे. सुशासन व नागरिकांची सनद, नगरपालिका नितीशास्त्र यावरही प्रभाकर वर्तक यांचे मार्गदर्शन होणार आहे. जिल्ह्यातील १० ही नगरपरिषदांच्या नगरसेवकांची या क्षमता बांधणी कार्यशाळेला उपस्थित राहावयाचे आहे. त्या आशयाचे पत्र संबंधित नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडून नगरसेकवकांना देण्यात आले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
जिल्ह्यातील नगरसेवकांची क्षमता बांधणी कार्यशाळा
By admin | Updated: February 23, 2015 00:16 IST