ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 25 - लोहारा-वाघापूर मार्गावरील साने गुरुजीनगर परिसरातील विहिरीमध्ये आढळलेल्या अज्ञात मृतदेहाचे गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडलेले असून दोन्ही हातांचे पंजेही गायब आहेत. हा मृतदेह २५ ते ३० वर्षे वयोगटाच्या व्यक्तीचा आहे. खून करून अर्धवट जळालेल्या अवस्थेतील हा मृतदेह विहिरीमध्ये आणून टाकण्यात आला.
त्याच्या गुडघ्यापासून बेपत्ता असलेल्या पाय व हाताच्या पंजांचा थांगपत्ता नाही. अतिशय क्रूर पद्धतीने या अनोळखी व्यक्तीला जीवाने ठार मारण्यात आले. वेगळ्याच ठिकाणी त्याचा खून करून व नंतर जाळण्याचा प्रयत्न करून हा मृतदेह या विहिरीत रात्री आणून टाकला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
घटनास्थळी वाहनाच्या चाकांचे ठसे न दिसल्याने वाहन रस्त्यावर उभे करून हा मृतदेह विहिरीपर्यंत आणण्यात आला असावा, त्यात एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग असावा, असा अंदाज आहे. लोहारा पोलीस ठाण्यात या प्रकरणी भादंवि ३०२, २०१ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली.
गेल्या २४ तासात यवतमाळ जिल्ह्यात किंवा शेजारील जिल्ह्यांमध्ये कुणी हरवल्याची, अपहरण झाल्याची नोंद आहे का, यावर पोलिसांनी तपास केंद्रित केला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान लोहारा पोलिसांपुढे आहे. त्यानंतरच या खुनाचे रहस्य उलगडणार आहे.