सोयाबीन सोंगलेच नाही : बोरी परिसरात शेतकऱ्यांचे नुकसानबोरीअरब : दुष्काळ नाही म्हणणाऱ्या प्रशासनाने बोरीअरब परिसरातील शेतकऱ्यांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्याची गरज आहे. परिसरातील १५ हून अधिक शेतकऱ्यांना सोयाबीन सोंगण्याचे कामच पडले नाही. नापिकी पाहून या शेतकऱ्यांनी हिरव्यागार उभ्या पिकात नांगर फिरविला. मनस्ताप सहन करणाऱ्या या कष्टकऱ्यांना शासनाने दिलासा देण्याची गरज आहे. यावर्षी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यातही पावसाने दगा दिला. अपार मेहनत घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीन कसेबसे जगवले. मात्र वाढलेल्या सोयाबीनच्या झाडांना शेंगाच लागल्या नाही. थोड्याथोडक्या शेंगा लागल्या तर त्यात दाणेच भरले नाही. हलक्या जमिनीतील सोयाबीन शेंगा पकडण्याआधीच वाळून गेले. सोयाबीन हिरवेकंच होते. पण वेळेवर पाऊस न आल्यामुळे शेंगा भरू शकल्या नाही. असे सोयाबीन सोंगण्याचा खर्च तरी कशाला करायचा, हा विचार करून शेतकऱ्यांनी उभ्या सोयाबीनवर नांगर फिरविला.पैसेवारीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे कृषी विभागाने दाखविले. प्रत्यक्षात मात्र अनेक शेतकऱ्यांना एकरी एक किंवा दोन पोते उत्पादन झाले. यात हलक्या जमिनीत तर किलोप्रमाणे शेतकऱ्यांच्या हाती सोयाबीन आले. सोंगायचे पैसे निघाले नाही. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणेही टाळले. उभ्या पिकात नांगरणी केली. ही परिस्थिती एकट्या बोरीअरब परिसरातीलच नाही, तर अनेक भागात दिसून येत आहे. यातील गजानन बोरकर, अनंता बोरकर, स्वप्नील पडगिलवार, राजू तांगडे, ओमप्रकाश लढ्ढा, अशोक पवने, बंडू कचरे, तीर्थेश्वर राऊत, सुधाकर चारोळे, विलास गिरी, भागिरथा गवई, मधूकर वीर, अविनाश तिवारी, शंकर महल्ले, कौसल्या इंगोले या शेतकऱ्यांनी उभे सोयाबीन नांगरून टाकले आहे. तर काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरे सोडली. खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी केली. पाण्याने दिलेल्या दग्यामुळे सोयाबीन निघाले नाही. यामुळे दुबार पेरणी करायचे काम पडले. यात सोयाबीन कसेबसे निघाले. नंतर अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने हलक्या जमिनीतील सोयाबीन वाळले. उर्वरित सोयाबीनला फुलोर यावा म्हणून महागड्या औषधांची फवारणी केली. तरीही फायदा झाला नाही. कशाबशा लागलेल्या शेंगाही पावसाअभावी भरू शकल्या नाही. शेवटी ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनी रबी पीक घेण्यासाठी उभे सोयाबीन नांगरले आहे. हरभरा पिकाच्या पेरणीला सुरुवात करण्यात आली. यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्याने परिसरातील विहिरींची पातळी योग्य प्रमाणात वाढलेली नाही. त्यामुळे रबीतील पिकांची पेरणीही कमी प्रमाणात होत आहे. खरीप हंगामात सोयाबीनला पाणी देण्यासाठी विहिरी होत्या. पण पुरेसे पाणी नव्हते. जिथे पुरेसे पाणी होते, तिथे वीज पुरवठा सुरळीत नव्हता. एकीकडे शासन पैसेवारीमध्ये पीक परिस्थिती उत्तम असल्याचे दाखवते. तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना उभ्या पिकात नांगर फिरवावा लागत आहे. (वार्ताहर)आधी पेरलं, तर पाण्याने चाट दिली. दुसऱ्यांदा पेरलेलं कसंबसं उगवलं, तर पुन्हा पावसाने दडी मारली. सोयाबीन हिरवे दिसत होते. पण शेंगाच भरल्या नाही. असे सोयाबीन सोंगून कुटारालाही महाग होते. म्हणून उभ्या पिकात नांगर फिरवला. सरकार वाळल्यासोबत ओलही जाळते. सरकारची मदत भेटतेच कुठे?- गजानन बोरकरशेतकरी, बोरीअरब
हिरव्या स्वप्नावर नांगर
By admin | Updated: November 2, 2015 01:52 IST