दामदुप्पट व्याज : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांजवळ एक छदामही नाहीउमरखेड : खरीप हंगाम तोंडावर आला असून खते आणि बियाण्यासांठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होणार आहे. या वर्षी दुष्काळाने पोळलेल्या शेतकऱ्यांजवळ पुरेस पैसे नसल्याने त्यांना पैशासाठी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी तालुक्यातील बंदी भागात आंध्र प्रदेशासह गावातील सावकार सक्रिय झाले आहेत. उमरखेड तालुक्याच्या पैनगंगा अभयारण्य परिसरात अनेक गावे आहेत. दऱ्याखोऱ्यात वसलेल्या या परिसरातील नागरिकांचा शेती आणि पशुपालन हा मुख्य व्यवसाय आहे. अलीकडच्या काळात वनविभागाच्या जाचक अटीमुळे पशुपालन कठीण झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतीवरच अवलंबून राहावे लागते. यंदा अपुऱ्या पावसाने खरीप उद्ध्वस्त झाला. शेतकऱ्यांच्या हातात फुटकी कवडी आली नाही. आगामी खरीपाच्या पेरणीसाठी बी-बियाणे आणि खते खरेदीसाठी पैसे नसल्याने सावकाराकडे धाव घ्यावी लागत आहे. बंदी भागातील अनेक गावात सावकार आणि त्यांचे दलाल सक्रिय आहेत. कुणाला पैसे लागल्यास दलालाच्या माध्यमातून सावकार पैसे उपलब्ध करून देतात. शेतकऱ्याला पैसे हवे असल्यास शेतीची पक्की खरेदी करून पैसे दिले जाते. त्यातही पैसे देताना दरमहा १० टक्के व्याज आकारून वर्षभराचे व्याजही कर्ज देतानाच वसूल केले जाते. शेतकऱ्याला हा प्रकार दिसत असला तरी नाईलाजाने सावकाराकडून पैसे घ्यावेच लागते. शेतीसोबतच सोने-चांदी गहाण ठेवून कर्ज दिले जाते. बंदी भागातील अनेक गावात आज प्रत्येक शेतकरी सावकाराच्या विळख्यात अडकला आहे. सहकार विभागाला हा अवैध सावकारीचा प्रकार माहीत आहे. काही जणांनी तक्रारीही केल्या. मात्र सावकाराच्या दबावाने कुणावरच कारवाई झाली नाही. पोलीसही या प्रकारात हतबलच दिसून येतात. बंदी भागातील अनेक शेतकऱ्यांच्या पक्की खरेदी सावकारांच्या नावाने असल्याचे दिसून येते. सावकार विरोधी अधिनियम अस्तित्वात येऊनही कारवाई होत नाही. बंदी भागातील आदिवासी हा प्रामाणिक आणि शब्दाला जागणारा आहे. आपल्याला कर्ज दिले म्हणजे सावकाराने उपकारच केले, अशी त्याची भावना असते. याच भावनेतून तो तक्रार करायला जात नाही आणि याच मानसिकतेचा फायदा सावकार घेतात. (शहर प्रतिनिधी)सावकारीत शेतीची पक्की खरेदीसावकारीत पैसे देताना सावकार शेतकऱ्यांकडून शेताची पक्की खरेदी करून घेतात. त्यामुळे शेतकऱ्याने पैसे दिले नाही तरी त्यांना कुठे धावपळ करावी लागत नाही. सरळ शेतावर ताबा बसविला जातो. अनेक शेतकऱ्यांच्या शेत्या अशाच पद्धतीने सावकारांच्या घशात गेल्या आहे. नाईलाजाने शेतकरी सावकाराचे कर्ज घेतो.
खरिपाच्या तोंडावर अवैध सावकार सक्रिय
By admin | Updated: May 21, 2015 00:10 IST