यवतमाळ : लग्न समारंभात होणारा अवाढव्य खर्च टाळण्यासाठी सामूहिक विवाह मेळाव्यांची संकल्पना पुढे आली. मात्र या मेळाव्यातही समाजाच्या प्रतिष्ठेसाठी मोठा खर्च होऊ लागला. परंतु नेर येथे झालेल्या बारी समाजाच्या विवाह मेळाव्याने या मेळाव्याला सामाजिक आशय प्राप्त करून दिला. कॅन्सरग्रस्त आयुषच्या उपचारासाठी अवघ्या तासाभरात या विवाह मेळाव्यात ७० हजार रुपयांचा निधी गोळा झाला. कधी पाहिले नाही, साधी ओळखही नाही, अशा एका चिमुकल्यासाठी अख्खा समाज उभा राहतो हा सर्वांसाठी प्रेरणादायी पायंडा ठरला आहे. यवतमाळ येथील आयुष धर्मेंद्र तोटे या १२ वर्षीय बालकाला ब्लड कॅन्सरने ग्रासले आहे. आयुषची आर्थिक विवंचना लक्षात घेता आयुषच्या आयुष्यासाठी ‘लोकमत’ने सामाजिक संवेदनांना हाक दिली. जिल्ह्याच्या विविध भागातून मदतीचे अनेक हात पुढे आले. ‘लोकमत’मधील वृत्त वाचून नेर येथील बारी समाजाच्या तरुणांनी कृतिशील पुढाकार घेतला. गुरुवार ८ मे रोजी बारी समाज नागवेली बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने नेर येथे विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला विदर्भाच्या कानाकोपर्यातील बारी समाज बांधवांची उपस्थिती होती. यानिमित्ताने आयुषला मदत व्हावी हा विचार काही तरुण कार्यकर्त्यांच्या मनात आला. मेळाव्यात भाषणबाजीऐवजी आयुषच्या मदतीसाठी आवाहन करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध बातमी वºहाड्यांना वाचून दाखविण्यात आली. यावेळी ‘लोकमत’मधील वृत्ताचे कात्रणसुद्धा लग्न मंडपात दर्शनी भागात लावण्यात आले होते. ही बातमी वाचून आयुषच्या आयुष्यासाठी मदतीची संवेदना जागी होत होती. याच संवेदनेतून अवघ्या तासाभरात ७० हजार २०० रुपयाचा निधी गोळा झाला. यवतमाळ येथील स्नेहल अभिषेक दुधे यांनी आपला वाढदिवस रद्द करून पाच हजार रुपयांची रक्कम समितीच्या कार्यकर्त्यांच्या सुपूर्द करण्यात आली. या सामूहिक विवाह मेळाव्यात ऐपतीप्रमाणे मदत करता यावी म्हणून समारंभातच मदत पेटी ठेवण्यात आली. समारंभाला आलेले बहुतांश वºहाडी या पेटीत मदतीचा हात सैल सोडताना दिसत होते. ही रक्कम आता ‘लोकमत’च्या माध्यमातून आयुषच्या उपचारासाठी दिली जाणार आहे. बारी समाज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. सामाजिक बुरसटलेपणाचे जोखड झुगारुन हा समाज प्रगतीचे एक एक शिखर गाठत आहे. त्यातूनच सामूहिक विवाह मेळाव्याची संकल्पना पुढे आली. दरवर्षी दारव्हा-दिग्रस परिसरात विवाह मेळावा आयोजित केला जातो. लग्न समारंभावर होणारा खर्च टाळत समाजाच्या विकासाचा विचार मनात असतो. याला बारी समाजातील तरुणांची मोठी साथ आहे. नेर येथील सामूहिक विवाह मेळाव्यात तरुणांनी दाखविलेल्या सामाजिक उत्तरदायित्वातून त्याची प्रचिती आली. (शहर प्रतिनिधी )
आयुषच्या मदतीसाठी ७० हजारांचा निधी
By admin | Updated: May 10, 2014 00:31 IST