संतोष मुंढे /वाशिमजिल्ह्यातून जाणार्या राज्य महामार्ग क्रमांक सहा वरील सावरगाव बर्डे या गावाला मुर्तीकलेचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे. परंतू चार दशकापासून आपल्या कलेची जोपासणा करणार्या कलावंतांना उद्योगवृध्दीसह सधनतेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी आजही राजाश्रय मात्र मिळाला नाही. सावरगावातील मुर्तीकला तशी जूनीच परंतू गत ५ ते १0 वर्षात परंपरागत पध्दतीने मुर्ती बनविण्याच्या कलेला फाटा देवून तेथील मुर्तीकारांना बदलता काळ व मागणीनुसार आपल्या कलेला आधूनिकतेचे रुप देण्याचे काम केले आहे.हस्तकलेतून मुर्तीची निर्मीती हा सावरगावच्या मुर्तीकारांच्या कलेचा गाभा. त्यामुळेच त्यांच्या कलेला पश्चिम विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यातून चांगली मागणी असते. पंडूलाल रामचंद्र पेंढारकर मागील ४0 वर्षापासून सावरगावात आपल्या जगतगुरु आर्टच्या माध्यमातून मुर्तीकलेची जोपासना करत आहे. मुर्तीच्या निर्मीतीसाठी लागणारे साहित्य राजस्थान व पुण्याहून खरेदी केले जाते. केवळ व्यावसायीकता न जपता कलेची कदर करणार्यांना कमी अधिक रक्कमेत मागणीनुसार देवीच्या मुर्त्या बनवून देण्याचे काम मुर्तीकार करतात. केवळ ब्लॉकच्याच नव्हे तर विना ब्लॉकच्याही मुर्त्या बनविण्यात सावरगावच्या पंडूलाल पेंढारकरांचे कसब वाखाणन्याजोगेच आहे. जवळपास सव्वाशे ते दिडशे दूर्गादेवीच्या मुर्त्या दरवर्षी पश्चिम विदर्भाच्या कानाकोपर्यात केवळ सावरगावच्या कलेची कदर करत सहज स्थापनेसाठी नेल्या जातात.
मुर्तीकलेच्या गावात कलेला हवा राजाश्रय
By admin | Updated: September 19, 2014 23:49 IST