मंगरूळपीर: येथील अकोला खासदार निधीतून उभारण्यात आलेला प्रवासी निवारा शिकस्त झाला असून, सभोवतालच्या अतिक्रमणामुळे तो पूर्णपणे झाकून गेला आहे. त्यामुळे येथील प्रवासी निवारा गेला तरी कोठे, असाच प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांसमोर उपस्थित होतो. मंगरूळपीर येथे गत काही वर्षांपूर्वी अकोला चौकात वाशिम कारंजा मार्गावर खासदार निधीतून प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारा बांधण्यात आला होता; परंतु या प्रवासी निवार्याच्या समोरच काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे हा निवारा सहजासहजी प्रवाशांना दिसतच नाही. त्यातच अकोल्याकडे जाणार्या बस अकोला मार्गावर, तर कारंजाकडे जाणार्या बस कारंजा मार्गावरच उभ्या राहण्याची प्रथा पडल्यामुळे प्रवाशांना त्या ठिकाणीच बसची प्रतीक्षा करत उभे राहावे लागते. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे चांगलेच फावले आणि त्यांनी प्रवासी निवार्यासमोरच दुकाने थाटली आहेत. या प्रवासी निवार्यातील फरशाही लंपास झाल्या असून, त्यामधील ओटेही जमिनदोस्त झाले आहेत. निवार्याच्या छतावरील अर्धी टिनपत्रेही गायब झाली आहेत. या निवार्यात प्रवाशांऐवजी इतरच साहित्य ठेवण्यात आल्याचे दिसते. यामध्ये पोलिस प्रशासनाकडून वाहतुक नियंत्रणासाठी वापरण्यात येणार्या लोखंडी बॅरीकेड्सचाही समावेश आहे. शासनाने पैसा खर्च करून सर्वसामान्यांच्या सोयीसाठी बांधलेल्या निवार्याची देखरेख करणे हे काम सर्वसामान्यांचे असताना त्यांच्याकडूनच त्याची मोडतोड करून त्यामधील साहित्य पळविण्याचे केविलवाणे प्रक ार घडत असतील, तर प्रशासनाने तरी काय करावे, असा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान, संबंधित विभागाने प्रवाशी निवार्यासमोरील अतिक्रमण त्वरीत हटवून त्याची डागडुजी करावी, अशी मागणी काही सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रवासी निवारा गेला तरी कोठे ?
By admin | Updated: August 5, 2014 20:29 IST