महावितरणकडून गेल्या काही दिवसांपासून थकबाकीदार वीज ग्राहकांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. त्यात आता ग्रामपंचायतीही ‘रडार’वर आल्या आहेत. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी १५ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पत्र पाठवून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या विद्युत देयक थकबाकीसंबंधी अवगत केले आहे. वाशिम तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठ्याचा विद्युत देयकापोटी १.६८ कोटी; तर विद्युत पथदिव्यांच्या विद्युत देयक थकबाकीपोटी ९.८५ कोटी असे एकूण ११.५३ कोटी रुपये थकीत आहेत. याशिवाय कारंजा तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे १२.५४, मालेगाव ११.८२, मंगरूळपीर १०.२१, मानोरा १३.९६ आणि रिसोड तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे १२.२९ कोटी रुपयांची थकबाकी झालेली आहे. संबंधित ग्रामपंचायतींना वारंवार आवाहन करूनही काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता तायडे यांनी सांगितले.
................................
ग्रामपंचायतींकडे असलेली थकबाकी (कोटींमध्ये)
कारंजा तालुका - पाणीपुरवठा - ०२.०१, पथदिवे - १०.५३
मालेगाव तालुका - पाणीपुरवठा - ०१.६०, पथदिवे - १०.२२
मंगरूळपीर तालुका - पाणीपुरवठा - ०१.३१, पथदिवे - ०८.०९
मानोरा तालुका - पाणीपुरवठा - ०१.२०, पथदिवे - १२.७६
रिसोड तालुका - पाणीपुरवठा - ०१.१३, पथदिवे - ११.१६
वाशिम तालुका - पाणीपुरवठा - ०१.६८, पथदिवे - ०९.८५
.........................
कोट :
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वारंवार आवाहन करूनही विद्युत देयकांची थकबाकी अदा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अखेर नाइलाजास्तव पाणीपुरवठा आणि विद्युत पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे. १४ व्या वित्त आयोगातून इतर सर्व कामे सुरळीतपणे केली जात आहेत. मात्र, विद्युत देयक भरण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची बाब गंभीर आहे.
- आर.जी. तायडे
कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम