वाशिम : शहरात खुलेआम गांजा विक्री सुरू असल्याचे 'लोकमत'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले. परप्रांतातून वाशिम शहरात गांजा आणून वितरण करणारी टोळी सकाळी पाटणी चौकामध्ये खुलेआम फिरत आहे. पाटणी चौकामध्ये महात्मा फुले मार्केट, बालाजी कॉम्प्लेक्स, गवळीपुरा परिसर, माहुरवेस, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, बालाजी मंदिर मागे गांजा विक्री बिनदिक्कत होत आहे. काही ठिकाणी पानठेल्यांवर विक्री होत आहे. काही महिन्यांआधी पोलिसांनी एका पानठेल्यावर धाड टाकून आरोपीसही अटक केली आहे. तसेच अमली पदार्थ विक्रीप्रकरणी यापूर्वी अनेक वेळा कारवाया झाल्या; मात्र पुन्हा एकदा अमली पदार्थ विक्री करणारी टोळी सक्रिय झाली आहे. आसाम व ओरिसा राज्यातून शहरात गांजा आणण्यात येतो. वाशिम शहरामधील काही गांजा व्यावसायीक मोठय़ा प्रमाणात जिल्हाभरात गांजा पाठवितात. चार हजार रुपये प्रतिकिलो दराने शहरात गांजाविक्री होते. खुलेआम गांजाविक्री करणारे परप्रांतीय गुन्हेगार पोलिसांना मात्र गुंगारा देत आहेत. शहरातील अडगळीत असलेल्या जागेवर विकत घेतलेला गांजा बिनदिक्कतपणे शौकीन ओढताना दिसून येतात. या गांजाच्या दुर्गंंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त होत आहेत. याकडे पोलीस विभागाने लक्ष देऊन यावर कडक कारवाई करणे गरजेचे झाले आहे. याप्रकरणी निश्चितपणे कारवाई करणार असल्याचे संकेत पोलिस ठाणेदार संग्राम सांगळे यांनी लोकमतशी बोलताना दिले.
वाशिम बनले गांजा विक्री केंद्र
By admin | Updated: January 28, 2015 00:21 IST