वाशिम : दिग्रस येथील सिमेंट विक्रेत्याकडून कमिशनपोटी लाच घेतल्याच्या आरोपात मानोरा तालुक्यातील उमरी खुर्द येथील ग्रामसेवकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, उमरी खुर्द येथे शासकीय योजनेतून राजीव गांधी सभागृह मंजूर झाले होते. सदर सभागृहाचे बांधकाम खासगी कंत्राटदाराला न देता ग्रामपंचायतीने स्वत: केले. ग्रामसेवक ए.जी. राऊत यांनी या कामासाठी दिग्रस येथील बाजोरिया ट्रेडर्समधून सिमेंट व लोखड खरेदी केली. त्यापोटी बाजोरिया ट्रेडर्सला ९६२८४ रूपये देयक धनादेशाद्वारे द्यायचे होते; परंतु ग्रामसेवक राऊत यांनी पूर्ण रकमेचा धनादेश देण्याऐवजी यापैकी केवळ ५0 हजार रूपये रोख दिले. उर्वरित ४६२८४ रूपये कमिशनपोटी स्वत: जवळ ठेवले. याप्रकरणी बाजोरिया ट्रेडर्सच्या संचालकांनी ७ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वाशिम कार्यालयात तक्रार दाखल केली. सदर तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामसेवक राऊत यांच्या विरूद्ध मानोरा येथील पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ग्रामसेवक राऊत मात्र पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले आहेत.
उमरीचा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
By admin | Updated: July 10, 2014 01:52 IST