शिखरचंद बागरेचा / वाशिमवाशिम तालुक्यातील सायखेडा व राजगाव येथे सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाही, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. गावालगतच्या एका विहिरीतील गढूळ व दूषित पाण्यानेच नागरिकांना तहान भागवावी लागत असल्याने साथरोग उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पर्यावरणाचा र्हास, विविध प्रकारच्या प्रदूषणांमधील वाढ व अन्य काही कारणांमुळे ऋतुमानात बदल होत आहे. पूर्वीच्या तुलनेत गत तीन वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील अनेक गावे पाणीटंचाईच्या दाहकतेत होरपळून निघत आहेत. वाशिम तालुक्यातील सायखेडा, राजगाव परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था नाही. परिणामी, तळ गाठलेल्या विहिरीतील गढळू पाण्याने नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. पाणी शुद्धीकरणाची सुविधा उपलब्ध असणार्या नागरिकांचा अपवाद वगळता उर्वरित नागरिकांना गढूळ पाण्यानेच तहान भागवावी लागत आहे. शेतामधून पाच किमी अंतरावरून महिला व पुरुषांना पाणी आणावे लागत आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या सायखेडा गावातील सर्व पाणवटे, विहीर, कूपनलिका आदी पाण्याचे स्रोत आटले असून, काही ठिकाणचे पाणी दूषित झाल्यामुळे पिण्यायोग्य नाही. तथापि, पर्यायी व्यवस्था नसल्याने गढूळ पाण्यात ह्यजीवन ड्रॉपह्ण टाकून पिण्यासाठी वापरावे लागत आहे. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा सायखेडचे रहिवासी अरविंद अहिरे पाटील यांनी २९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देऊन सायखेडा व राजगाव येथील भीषण परिस्थिती कथन केली. दूषित पाण्यामुळे होणारे संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी सायखेडा व राजगाव येथे तत्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी अहिरे यांच्यासह गणेश वायचाळ, गजानन वानखेडे, गणेश देशमुख, दामू कव्हर आदी ग्रामस्थांनी केली.
दूषित पाण्यावरच भागविली जातेय तहान!
By admin | Updated: May 1, 2016 01:07 IST