रिसोड (जि. वाशिम) : शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सामाजिक न्याय विभाग मुलांच्या शासकीय वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या आकाश सुखदेव साळवे (वय १९) या विद्यार्थ्याने राहत्या खोलीतील सिलिंग फॅनला शनिवार २४ जानेवारीच्या मध्यरात्रीदरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार सकाळी उघडकीस आली. या विषयी सविस्तर वृत्त असे की मृतक आकाश सुखदेव साळवे हा राहणार पानकन्हेरगाव, ता. सेनगाव येथील रहिवासी असून, रिसोड येथील पुष्पादेवी पाटील महाविद्यालयात बीएससीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. वाशिम रोडवरील सवड गावाजवळ असलेल्या शासकीय वसतिगृहात राहत होता. घटनेच्या दिवशी आकाशच्या सोबत रूममध्ये राहत असलेला मित्र हा बाहेरगावी गेल्याने त्या दिवशी आकाश हा रूममध्ये एकटाच होता. उशिरा रात्रीपर्यंत हेड फोन लावून मोबाईलवर बोलत होता. याच अवस्थेत मोबाईलवर संभाषण करीत त्याने रूममधील सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केल्याचे घटनास्थळावरील चर्चेवरून दिसून येते. रविवारच्या सकाळी वसतिगृहातील विद्यार्थी आकाशच्या रूममध्ये गेले असता ही घटना उघडकीस आली. वसतिगृहातील कर्मचार्यांनी दूरध्वनीवरून सर्वप्रथम पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा करीत मृतकाचे प्रेत शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मृतक आकाश याच्यावर दुपारी दोनच्या दरम्यान राहत्या गावी पानकन्हेरगाव येथे अंतिम संस्कार करण्यात आले. दरम्यान, वसतिगृहातील घटनेचे गांभीर्य ओळखून वाशिमचे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त एम.जी. वाठ व इतर अधिकार्यांनी वसतिगृहाला भेटी देऊन विद्यार्थी व कर्मचार्यांचा लेखी जबाब घेतला. घटनेचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला. यावेळी त्यांनी मृतक आकाशच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेटसुद्धा घेतली. वृत्त लिहेपर्यंत आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. गत दहा दिवसांपूर्वीच सवड येथील दोन युवतींची आत्महत्या ही घटना विसरत नाही तोच दुसरी वसतिगृहातील आत्महत्येची घटना घडल्याने परिसरात उलट-सुलट चर्चेला वाव मिळत आहे.
शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्याची आत्महत्या
By admin | Updated: January 26, 2015 01:13 IST