सिंदखेडराजा/ खामगाव : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आज मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून विदर्भ मुक्ती यात्रेला प्रारंभ करण्यात आला. विदर्भ मुक्ती यात्रैचे चिखली, खामगाव या शहरांसह ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. विदर्भ मुक्तीचा संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी सिंदखेड राजा ते नागपूर विदर्भ मुक्ती यात्रा आयोजित करण्यात आली आहे. नागपूर येथील जनमंच संघटनेतर्फे या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जनमंचचे अध्यक्ष अँड. अनिल किलोर यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या राजवाड्यात या यात्रेला हिरवी झेंडी दिली. त्यानंतर चिखली मार्गे ही यात्रा दुपारी ४ वाजता खामगावात पोहोचली. यावेळी यात्रेचे शहरात ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. विदर्भ जनजागृती रथ आणि दुचाकी व चारचाकी वाहनातून युवक विदर्भ मुक्तीचा संदेश देत आहेत. नागपूर येथील दीक्षाभूमीवर यात्रेचा समारोप होणार आहे. संघटनेचे सल्लागार प्रा. शरद पाटील, उपाध्यक्ष प्रमोद पांडे, सहसचिव अँड. मनोहर रडके, प्रकाश इटनकर, राम आखरे यांच्यासह असंख्य युवा कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले आहेत. जनमंचचे अध्यक्ष अँड. अनिल किलोर यांनी संयुक्त महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होणे अशक्य असल्याचे सांगीतले. वेगळा विदर्भ ही काळाची गरज आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भासाठी मुक्ती यात्रा सिंदखेडराजा येथून काढण्यात आली आहे. या यात्रेला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
‘जनमंच’च्या विदर्भ मुक्ती यात्रेला सिंदखेडराजा येथून प्रारंभ
By admin | Updated: September 21, 2014 00:57 IST