वाशिम : जिल्ह्याच्या काही भागात यंदा मृग नक्षत्रात हजेरी लावणार्या पावसाने त्यानंतर मात्र दडी मारली आहे. परिणामी, शेतकर्यांच्या पहिल्या पेरण्या उलटल्या असुन जिल्हा दुष्काळाच्या उंबरठय़ावर उभा आहे. पावसाअभावी सुकत असेलेले पिकं वाचविण्यासाठी धडपडणार्या शेतकर्यांच्या नजरा आता आकाशाकडे खिळल्या आहेत. वातावरणातील बदलाची झळ सर्वच क्षेत्रांना पोहचते. पावसाळा सुरू होवून एक महिन्याचा कालावधी लोटत आला असताना पाहिजे तसा पाऊस न आल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. भाजीपाल्यांच्या भावामध्ये प्रचंड वाढ झाली असल्याने गृहीणींचे बजेट कोलमडले असल्याने प्रत्येकाला पाऊस यावा असे वाटत असताना वरूणराजा मात्र रूसलेला दिसून येत आहे. वरूणराजाची कृपा व्हावी याकरिता विविध ठिकाणी धोंडया, देवी देवतांना अभिषेक केल्या जात आहे. वाशिम तालुक्यातील जांभरूण परिसरात अनेक शेतकर्यांनी पेरण्या केल्यात या पेरण्या पावसाअभावी उलटल्या आहेत. दुबार पेरणी करीता पुन्हा पावसाची प्रतीक्षा या भागातील शेतकरी करताना दिसून येत आहे. रिसोड तालुक्यातील नेतन्सा येथे सुरूवातीला पेरणी लायक पाऊस पडल्याने जवळपास शंभर टक्के शेतकर्यांनी पेरणी केली. पेरणी केल्यानंतर एकदाही पाऊस न आल्याने केलेली पेरणी उलटणार असल्याच्या भितीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वाशिम जिल्हयात असलेल्या लघु व मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने यावर्षी पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. मालेगाव तालुक्यातील अनेक धरणे कोरडी तर काही धरणातील पाण्याची पातळीत घट झाली आहे. पाणी असतांना शेतकर्यांनी शेतीसाठी पाण्याचा वापर केला असल्याने व आता त्यांना सुध्दा पाणी नसल्याने सर्वासमोर संकट उभे राहिले आहे.
नजरा आकाशाकडे खिळल्या
By admin | Updated: July 8, 2014 22:54 IST