बंडखोरी भोवली : अनंतराव देशमुख काँग्रेसमधून निष्कासित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:37 PM2019-10-15T13:37:11+5:302019-10-15T13:38:21+5:30

त्यांनी भाजपाशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्येही त्यांना यश न आल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

Revolt Bholai: Anantharao Deshmukh expelled from Congress | बंडखोरी भोवली : अनंतराव देशमुख काँग्रेसमधून निष्कासित

बंडखोरी भोवली : अनंतराव देशमुख काँग्रेसमधून निष्कासित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराविरुध्दात निवडणूक रिंगणात उडी घेऊन बंडखोरी केल्याने काँग्रेसचे जेष्ठ नेते अनंतराव देशमुख यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे. यासंदर्भात महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला.
वाशिम जिल्हयात काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी खासदार अनंतराव देशमुख म्हणून परिचित आहेत. अनंतराव देशमुख पक्षापासून नाराज असल्याचे सर्वश्रृत होते. त्यांनी गत विधानसभा निवडणुकीकरिता सुध्दा पक्षाकडे रिसोड विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मागितली होती. तेव्हा त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. उमेदवारी नाकारल्याने अनंतराव देशमुख दुसऱ्या पक्षाच्या शोधात होते, तसे त्यांनी प्रयत्नही केलेत. ही बाब पक्षश्रेष्ठींना सुध्दा माहित झाल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत लोकसभा मतदारसंघ अकोल्याची धुरा त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. अकोला लोकसभेचे उमेदवार हिदायत पटेल यांच्यासोबत त्यावेळी ते होते. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून रिसोड मतदारसंघासाठी आपला विचार होईल असे त्यांना वाटत होते. त्यांनी पक्षातील नेत्यांशी संपर्क ही केला, परंतु पक्षाकडून आपला विचार होत नाही याची कल्पना त्यांना झाल्याने त्यांनी भाजपाशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्येही त्यांना यश न आल्याने अखेर शेवटच्या क्षणी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशान्वये निष्कासीत करण्यात आले असल्याची माहिती महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी दिली.
 
आपल्याकडे पक्षाचे कोणते महत्वाचे पद नाही. आपण गत काही वर्षापासून पक्षात कार्यरतही नाही त्यामुळे आपल्याला निष्कासित करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. या कार्यवाहीची आपल्याला काही कल्पना सुध्दा नाही.
- अनंतराव देशमुख
अपक्ष उमेदवार, रिसोड


काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केल्याने पक्षाच्यावतिने त्यांचे सदस्य पद रद्द करुन त्यांना पक्षातून निष्कासीत करण्यात आले आहे. याची कल्पना जिल्हाध्यक्षांना सुध्दा सकाळीच देण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांवर ही कारवाई आहे.
- अ‍ॅड. गणेश पाटील
सरचिटणीस, महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटी


अनंतराव देशमुखांना निष्कासीत केले असल्याची आपल्याला कल्पना नाही. काल निष्कासित केले असल्यास आज आपल्याला फॅक्सव्दारे माहिती देण्यात येणार आहे. तुर्तास याची कल्पना आपल्याला नाही.
- अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी वाशिम

Web Title: Revolt Bholai: Anantharao Deshmukh expelled from Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.