वाशिम : विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचार्यांनी १ ऑगस्टपासून सुरु केलेले काम बंद आंदोलन सुरूच असल्याने तहसीलमध्ये कामानिमित्त आलेल्या अनेक नागरिकांना परत जावे लागले. यामध्ये आज तहसीलरांनीही सहभाग घेतल्याने आज तहसील कार्यालयातील त्यांचे कक्ष बंद दिसून आले. नायब तहसीलदारांना राजपत्रित दर्जा देण्यात यावा, लिपिकांना महसूल सहायक असे पदनाम द्यावे, चुतुर्थश्रेणी कर्मचार्यांच्या मुलांना नोकरीत घ्यावे. आदी विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचार्यांनी शुक्रवारपासून (दि. १) बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या कामबंद आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालयांत वरीष्ठ अधिकारी वगळता बहुसंख्य कर्मचारी आंदोलनात सहभागी आहेत. त्यामुळे आंदोलनाच्या आज दुसर्या दिवशीही महसूल कार्यालयांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. ५ ऑगस्ट रोजी दिवसभर वाशिम तहसिल कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांना माघारी परतावे लागत होते. जातीचे दाखले, जमिनीचा उतारा आदींबाबत नागरिकांची गैरसोय होत आहे. जमिनीच्या वादांबाबत अतिरीक्त जिल्हाधिकारी यांच्यासमोर होणार्या सुनावण्या संपामुळे पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता प्रशासनातील सुत्रांकडून व्यक्त करण्यात आली. आंदोलनात तलाठी वगळता तहसिलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपिक, वाहनचालक, शिपाई आदी जिल्ह्यातील शेकडो अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. जिल्हयातील ईतरही तालुक्यात अशीच परिस्थिती होती.
महसुल कर्मचार्यांचा संप सुरूच; तहसील परिसरात शुकशुकाट
By admin | Updated: August 5, 2014 23:13 IST