राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या निर्देशानुसार २५ सप्टेंबर २०२१ रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. धनादेश अनादर प्रकरणे, बँकेची कर्जवसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणीदेयकांबद्दलची आपसात तडजोड करण्याजोगी प्रकरणे वगळून इतर प्रकरणे, आपसात तडजोड करण्याजोगी फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद, भू-संपादन प्रकरणे तसेच मनाई हुकुमाचे दावे, विशिष्ट पूर्वबंध कराराचे पूर्तताविषयक वाद आदी दिवाणी प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
०००००००००
वाद सामोपचाराने मिटवावे
उपरोक्त संवर्गातील प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत अथवा खटलापूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत, त्यांनी आपली प्रकरणे आपसात मिटवण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरिता संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलजा शं. सावंत तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश संजय पां. शिंदे यांनी केले.