वाशिम : स्थानिक मंत्री पार्क जवळ ६ सप्टेंबर रोजी डीबी पथकाने एका व्यक्तीस पिस्टल व जीवंत काडतुसासह अटक करण्यात यश मिळविले. कपील जगन्नाथ कळंबे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात अवैध हत्यारांची विक्री होत असून एक इसम अल्लाडा प्लॉट परिसरातून मंत्री पार्क मार्गे शहरात अग्नीशस्त्र पिस्टल घेवून जात असल्याची गुप्त माहिती डिबी पथकाला मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम सांगळे यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे पोलीस निरीक्षक उदय सोयस्कर यांनी सापळा रचून दुचाकीवर येणार्या कळंबे यास थांबविले. तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना पोलिसांनी झडप घालून त्यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक देशी बनावटीचे पिस्टल व ४ जिवंत काडतुस आढळून आल्याने त्याच्या विरुध्द भारतीय हत्यार कायदा ३, २५ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या आदेशान्वये व उपविभागीय पोलीस अधिकारी आर.व्ही. दंदाळे, पोलीस निरीक्षक संग्राम सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उदय सोयस्कर करीत आहेत.
जीवंत काडतुसासह एकास अटक
By admin | Updated: September 7, 2014 22:55 IST