वाशिम : जिल्हयाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारा जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीतील अनपेक्षीत निकालानंतर राजकीय उलथापालथींना सुरुवात झाली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती विरोधात सत्ताधारी गटाच्या ८ व विरोधी गटाच्या ५ अशा एकूण १३ सदस्यांनी एल्गार पुकारला असून ९ सप्टेंबर रोजी सभापती सुरेश शिंदे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. मालेगाव बाजार समितीमध्ये मार्केट बचाव पॅनलचे वर्चस्व आहे. जवळपास ८ महिन्यापूर्वी मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदी सुरेश शिंदे यांची निवड झाली होती. त्यानंतर काही महिन्यातच सभापती शिंदे हे संचालकांना विश्वासात घेवून चालत नसल्याची ओरड सत्ताधारी तसेच विरोधी गटाच्या संचालकांकडून होवू लागली. त्याचाच परिपाक म्हणून सभापती शिंदे यांच्या विरोधात १३ सदस्यांनी एकजुट होऊन ९ सप्टेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. दाखल प्रस्तावावर १५ दिवसांच्या आत सभा घेवून निर्णय घेणे प्रशासनाला क्रमप्राप्त असल्याने येत्या १९ सप्टेंबर रोजी या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी नियमानूसार संचालकांची सभा व निर्णय घेण्याची प्रक्रीया वेळेत केली जाणार असल्याचे सांगीतले.
सभापतीविरुध्द अविश्वास प्रस्ताव
By admin | Updated: September 10, 2014 00:39 IST