शिखरचंद बागरेचा/वाशिममहाराष्ट्र राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या महायुतीसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी तुटल्याने राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही असे चित्र दिसून येत असल्याचा सुर लोकमतच्या परिचर्चेतुन निघाला. स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालय येथे रविवार ५ ऑक्टोबर रोजी आघाडी व युतीच्या घटस्फोटामुळे निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या परिचर्चेमध्ये शहरातील प्रा. विजया जाधव, प्रा. अबरार मिर्झा, डॉ. राजीव अग्रवाल, प्रा.कमल अग्रवाल, उज्वलाताई उकळकर, संगिता उकळकर, व रोहिणी कळमकर आदी मान्यवरांनी सहभाग घेतला .राज्यातील नागरिकांना रस्ते, पाणी व विद्युत या मुलभुत समस्या भेडसावत असून संपूर्ण राज्याचा विकास होण्यासाठी कोणत्याही एका पक्षाचे सरकार स्थापन व्हावे असे विचार उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले. एक हाती सत्ता असल्यानेच राज्याचा विकास होऊ शकतो असे ठाम मत व्यक्त करताना राजकीय अस्थिरतेचे वारे कोणत्या दिशेने वाहतील हे सांगता येणे शक्य नाही. तरी या अस्थिरतेमुळे महाराष्ट्र राज्याची स्थिती दिल्ली सारखी तर होणार नाही अशी भितीही मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.
राजकीय अस्थिरतेमुळे कुणालाही बहुमत अशक्य
By admin | Updated: October 6, 2014 00:37 IST