वाशिम : संपूर्ण विदर्भातील जनतेत राष्ट्रभावना जागृतीसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याबाबत तसेच त्यांचा थोर पूरुषांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यासाठी करावयाच्या जनजागराकरिता क्रांतीदिनी सुरु झालेली राष्ट्रसंतांची क्रांतीज्योत यात्रा मंगळवार १२ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात दाखल होत आहे. राष्ट्रसंताचा थोर पुरुषांच्या यादीत समावेश नसल्याचे बाब ह्यलोकमतह्णने उजेडात आणल्यानंतर राज्यभरातील जनतेतून याबाबत तिव्र संताप व्यक्त केला गेला. या विषयीच्या जनभावनेने चांगलाच जोर पकडला असून आता माघार नाही म्हणत वारकरी संप्रदायासह लाखो गुरुदेवभक्त राष्ट्रसंतांचा समावेश थोर पुरुषांच्या यादीत शासनाने त्यांचा सन्मान करावा यासाठी सज्ज झाले आहेत. मुळस्थान गुरुकुंज आश्रम मोझरी येथून अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळाने याविषयी जनजागृतीचा संकल्प केला आहे. त्यासाठी क्रांतीदिनापासून क्रांतीज्योत यात्रेला राष्ट्रसंतांच्या समाधिचे दर्शन घेवून सुरुवात केली केली आहे. नवक्रांतीची मशाल हाती घेवून मार्गस्थ झालेली क्रांतीज्योत यात्रा मंगळवार १२ ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्ह्यातून जैनांची काशी म्हणून ओळखल्या जाणार्या मालेगाव तालूक्यातील शिरपूर जैन येथे सायंकाळी ४ वाजेदरम्यान दाखल होईल. तेथे काही वेळ ओंकारगिर महाराज संस्थानमध्ये जनप्रबोधन करुन सायंकाळी ६ वाजेपर्यंत सामूदायीक प्रार्थना व प्रबोधनपर कार्यक्रमाच्या अनुषंगाने रिसोड येथे दाखल होईल. त्या ठिकाणी त्या दिवशी मुक्कामाला राहणारी ही यात्रा १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मालेगावात दाखल होईल. तेथील कार्य आटोपून सकाळी ११.३0 च्या सुमारास ही यात्रा वाशिम येथे दाखल होणार आहे. तेथील कार्यक्रम आटोपून यात्रा दूपारी १२.३0 ते १ वाजेदरम्यान मंगरुळपीर येथे दाखल होणार आहे. दूपारी ३ वाजेदरम्यान कारंजा व त्यानंतर ४ ते ५ वाजेदरम्यान मानोरा शहरात ही यात्रा जनप्रबोधन करत दाखल होणार आहे. मानोरा येथील कार्यक्रम आटोपून सायंकाळी ६ वाजेदरम्यान सामुदायीक प्रार्थनेच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील पूसद येथे मुक्कामाच्या अनुषंगाने क्रांतीज्योत यात्रा दाखल होणार असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी राष्ट्रसंतांच्या या क्रांतीज्योत यात्रेचे स्वागत करण्यासह शेकडो गुरुदेवप्रेमी या यात्रेत सहभागीही होणार असल्याची माहिती अखील भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रचारक साहेबराव पाटील यांनी दिली.
राष्ट्रसंतांची क्रांतीज्योत वाशिम जिल्ह्यात
By admin | Updated: August 10, 2014 23:28 IST