दादाराव गायकवाड /वाशिम
जिल्ह्यातील साक्षरतेचा टक्का वाढला असल्यावर २0११ च्या जणगणनेने शिक्कामोर्तब केले आहे. २00१ मध्ये असलेला ७३.४ चा आकडा २0११ मध्ये ८१.७ वर पोहोचला आहे. जनतेत शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करून लिहिण्या-वाचण्याचे महत्त्व पटवून देणे, स्वत:चे अधिकार कळावे, तसेच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून ८ सप्टेंबर रोजी जगभरात साक्षर ता दिवस साजरा करण्यात येतो. कोणत्याही देशाची साक्षरता ही त्या देशाच्या विकासाचा पाया असतो. जगातील विकसनशील देशांमध्ये भारताचा समावेश असून, साक्षरतेकडे दुर्लक्ष करून या देशाचाही विकास होणे शक्य नाही. कृषी प्रधान देश म्हणून ओळखल्या जाणार्या भारतात काही मोठय़ा समस्याही आहेत. त्या कमी करून देशातील जनतेत विश्वास निर्माण करण्यासह साक्षरतेचे प्रमाण वाढवून देशाचा विकास साधण्यासाठी भारत सरकारच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. त्यापैकीच एक सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे सर्व शिक्षा अभियान होय. आजच्या घडीला आपल्या देशात समाजातील सर्वच घटकांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त आहे. केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक योजनांचे परिणामही दिसत असून, देशातील साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. देशाच्या साक्षरतेचा विचार केल्यास १९४७ मध्ये देशातील साक्षरतेचे प्रमाण केवळ १२ टक्के होते, तर २00७ मध्ये साक्षरतेचे प्रमाण ६८ टक्के झाले. त्यावरून देशाचा झपाट्याने विकास होत असल्याचे दिसते. साक्षरता दिवसाच्या निमित्ताने वाशिम जिल्हय़ातील साक्षरतेचे प्रमाण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जिल्हय़ातील साक्षरतेचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले असून, २00१ ते २0११ च्या कालावधीत जिल्हय़ाच्या साक्षरता प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
वाशित तालुक्यात २00१ मध्ये साक्षरतेचे प्रमाण ७२.४४ होते, तर २0११ मध्ये हेच प्रमाण ८१. ९१ टक्के झाले. अर्थात वाशिम तालुक्याच्या साक्षरतेत २00१ ते २0११ या कालावधीत साडे नऊ टक्क्यांनी वाढ झाली. रिसोडमध्ये २00१ ला साक्षरतेचे प्रमाण ७१.0२ होते. यामध्ये २0११ पर्यंतच्या कालावधित नऊ टक्क्याहून अधिक वाढ होत. या तालुक्यातील साक्षरता ८0.0६ टक्क्यांवर आली. मालेगाव शहरात २00१ मध्ये साक्षर तेचे प्रमाण ७0.२७ होते, तर २0११पर्यंत त्यामध्ये १0 टक्क्यांची वाढ होऊन ते प्रमाण ८0.९४ वर आले. मानोरा तालुक्यात २00१ ला ७0.१२, असे साक्षरतेचे प्रमाण होते. त्यामध्ये २0११ पर्यंत जवळपास ८ टक्क्यांची वाढ होऊन ती टक्केवारी ७७.९२ वर आली. कारंजा तालुक्यात २00१ ला ७८.५६ टक्के लोक साक्षर होते, तर २0११ ला या तालुक्यातील साक्षर लोकांचा टक्का ८४.९७ वर आला. म्हणजे या तालुक्यातील साक्षरतेचे प्रमाण १0 वर्षांत साडे सहा टक्क्यांनी वाढले. मंगरुळपीर तालुक्यात २00१ ला ७६.९५ टक्के लोक साक्षर होते. त्यामध्ये २0११ पर्यंंत जवळपास सहा टक्क्यांची वाढ होऊन या तालुक्यातील साक्षरतेची टक्केवारी ८३.५९ वर पोहोचली. संपूर्ण जिल्हय़ाचा विचार करता वाशिम जिल्हय़ात २00१ ला साक्षरतेची टक्केवारी ७३.४ होती, त्यामध्ये २0११ पर्यंत १0 वर्षांंच्या कालावधित आठ टक्क्यांनी वाढ होऊन हे प्रमाण ८१.७ वर आले. महिला आणि पुरुषांच्या साक्षरतेचा विचार करता २00१ ला साक्षर पुरुषांची टक्केवारी ८५.४ होती, तर साक्षर महिलांची टक्केवारी ६0.६ होती. त्यानंतर २0११ पर्यंंतच्या १0 वर्षांंत पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या साक्षरतेत मोठी वाढ झाली. या कालावधित साक्षर महिलांची टक्केवारी तब्बल बारा टक्क्यांनी वाढून हे प्रमाण ६0.६ वरून थेट ७२.३ वर आले, तर पुरुषांच्या साक्षरतेत केवळ नऊ टक्केच वाढ झाली आणि २00१ ला असलेले साक्षर पुरुषांचे प्रमाण ८५.४ वरून ९0.५ टक्क्यावर पोहोचले.