वाशिम : जादा दराने सोयाबिन बियाण्याची विक्री करणे, साठा रजिस्टर नियमित नसणे, पावतीमध्ये खोडतोड आदी कारणांवरून मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील बाभणाजी कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी ९ जुलै रोजी दिले आहेत.पोहरादेवी येथील बाभनाजी कृषी सेवा केंद्राचे संचालक सोयाबीन बियाण्याची जादा दराने विक्री करीत असल्याची तक्रार एका शेतकर्याने कृषी विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा कृषी अधिकारी अभिजित देवगीरकर यांच्या पथकाने ८ जुलै रोजी पोहरादेवी येथे भेट देऊन सदर कृषी सेवा केंद्राची पाहणी केली. यावेळी साठा रजिस्टर व्यवस्थित ठेवले नसल्याचे आढळून आले. बियाणे विक्रीच्या पावती बुकमध्ये खोडतोड, रेकॉर्ड न ठेवणे, खते, बियाणे व किटकनाशकांच्या शासकीय किंमतीचे दरपत्रक न लावणे आदी त्रुट्या देवगिरकर यांच्या पथकाला आढळून आल्या होत्या. ८ जुलै रोजी देवगिरकर यांनी पुढील आदेशापर्यंत माल विक्री बंदचे आदेश देऊन कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या न्यायालयात सादर केला होता. याप्रकरणी कृषी विकास अधिकारी सुर्यवंशी यांनी तक्रारकर्ते शेतकरी व बाभणाजी कृषी सेवा केंद्राच्या संचालकांची आज (दि.९) कृषी कार्यालयात सुनावणी घेतली. यावेळी पावती बुकमध्ये खोडतोड आढळल्याने जादा दराने बियाण्याची विक्री केल्याचे सिद्ध झाले तसेच कोणतेही रेकॉर्ड नियमित ठेवले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. सुनावणीदरम्यान कृषी सेवा केंद्राचे संचालक दोषी आढळल्याने बियाणे नियंत्रण अधिनियम १९८३ नुसार बाभणाजी कृषी सेवा केंद्राचा बियाणे, खते व किटकनाशकाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश सुर्यवंशी यांनी दिले. शेतकर्यांची फसगत करणार्या कृषी सेवा केंद्रांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नसल्याचा संदेश कृषी विभागाने या आदेशातून दिला आहे.
बाभणाजी कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द
By admin | Updated: July 10, 2014 01:52 IST