वाशिम : अन्न व पुरवठा विभागाचा शासकीय ४0 क्विंटल गहू खुल्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेला टेम्पो पोलिसांनी मंगरूळपीर मार्गावरील जागमाथा परिसरात पकडला. ही कारवाई शहर पोलिस व एलसीबीच्या पथकाने संयुक्तरीत्या २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता केली. अनसिंग मार्गावर असलेल्या एका गोदामामधून शासनाचा गहू खुल्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती वाशिम शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संग्राम सांगळे व एलसीबीचे पोलिस निरीक्षक पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांच्या पथकाने जागमाथा परिसरात टेम्पो पकडला. या टेम्पोमध्ये प्रथमदर्शनी शासनाचा ४0 क्विंटल गहू आढळून आला. उपरोक्त पथकामध्ये सहायक पोलिस निरीक्षक शेख, जमादार सिद्धार्थ राऊत, उत्तम गायकवाड, नितीन काळे, विनोद अवगळे, विपुल शेळके, संदीप इढोळे, धनंजय अरखराव यांचा समावेश होता. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बाजारात जाणारा रेशनचा ४0 क्विंटल गहू पकडला
By admin | Updated: October 3, 2014 00:39 IST