वाशिम : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील आर्थिक विवंचनेत असणार्या मुलांच्या सर्वांंगीण विकासाच्या दृष्टीने भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) एक प्रकल्प हाती घेतला असून, या माध्यमातून या मुलांच्या सामाजिक, शैक्षणिक विकास व आरोग्यविषयक गरजांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नरत राहणार असल्याची माहीती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी शनिवारी 'लोकमत'शी बोलताना दिली. भारतीय जैन संघटनेची स्थापना समाजप्रवर्तक शांतीलाल मुथा यांनी केली आहे. या धर्मानिरपेक्ष संघटनेचे जाळे संपूर्ण भारतभर विणले गेले आहे. एका लाखापेक्षा जास्त नि:स्वार्थ कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील एक हजारांहून अधिक नामांकित तज्ज्ञ लोकांच्या संघटनेमध्येसहभाग असल्याचे पारख यांनी सांगितले.प्रश्न : आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना शिक्षण देण्यामागील उद्देश काय? उत्तर : पालकांच्या आत्महत्येमुळे सैरभैर झालेल्या मुलांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यात सुधारणा घडवून, त्यांच्यात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आणि त्यांना समाजाचे उत्पादनक्षम व जबाबदार नागरिक घडविणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. त्यांना शिक्षण देण्यासोबतच त्यांच्यावर सुसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रश्न : ह्यबीजेएसह्णच्या कार्यपद्धतीचे सूत्र कोणते ?उत्तर : संघटना पंचसूत्रीनुसार आपली कार्यपद्धती राबविते. यामध्ये मोजक्या क्षेत्रांतील समस्यांसाठी संशोधनावर आधारित उपाय शोधणे, पारदश्री उपक्रम राबवून त्यावर प्रतिक्रिया मागवून सुधारणा करणे, सुधारणांसाठी उपक्रमांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन व पुनरावलोकन करून बदल करणे, संपूर्ण भारतात कुठेही उपयोगी ठरू शकतील आणि ज्यांचा सहज विस्तार व पुरस्कार होईल असे प्रकल्प विकसित करणे या बाबींचा अंतर्भाव केला जातो. प्रश्न : शैक्षणिक उपक्रमांबद्दल आपण काय सांगाल ? उत्तर : शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यावर संघटनेचा भर आहे. शाळा स्तरावर मूल्यमापन व मूल्यांकन पद्धती तसेच शिक्षणाचे मूल्यवर्धन हा उपक्रम बीजेएस राबवित आहे. प्रश्न : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांसाठी संघटना काय करणार ? उत्तर : गत काही वर्षांंपासून सततच्या नापिकीमुळे हवालदिल झालेले राज्यातील शेतकरी आत्महत्येकडे वळत आहेत. विशेषत: विदर्भ व मराठवाड्यात या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मुळात आत्महत्येची घटना घडायलाच नको; मात्र अशा घटना झाल्यानंतर कुटुंबाचा आधारवड निखळतो. त्याचे विपरीत परिणाम त्या कुटुंबाला मोजावे लागतात. म्हणून संघटनेने राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना पाचवी ते बारावीपर्यंंंतचे शिक्षण नि:शुल्क देण्याचा निर्धार केला आहे.प्रश्न : या प्रकल्पाची आवश्यकता आपणास का वाटली ?उत्तर : कुटुंबातील प्रिय व्यक्ती गमावणे हा कुणासाठीही मोठा भावनिक आघात असतो. कुटुंबातील मुख्य, कमावती व्यक्ती निघून गेल्यास, त्या कुटुंबावर आर्थिक, सामाजिक व मानसिक संकट ओढवते आणि संपूर्ण कुटुंबामध्ये नैराश्याचे वातावरण पसरते. अशा वेळी पीडित कुटुंबातील मुलांना कुठल्या तरी विधायक गोष्टीत गुंतवणे व त्यांच्या आयुष्याला वेगळे ध्येय दाखवून, त्याकरिता योग्य दिशा देण्यासाठीच आपणास या प्रकल्पाची आवश्यकता वाटली.
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांना घेणार दत्तक !
By admin | Updated: June 8, 2016 02:42 IST