विरार : नालासोपारा शहरात एका काकाने आपल्या अल्पवीन पुतणीवर बलात्कार करून नंतर तिचे शेजारी राहणाऱ्या एका इसमाशी लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार, पोस्को अन्वये गुन्हा दाखल करून पिडीत मुलीचा काका सौरभ शेखला अटक केली आहे. तर मुलीशी लग्न करून तिच्यावर अत्याचार करणारा माफीज फरार झाला आहे.नालासोपारा पश्चिमेला श्री प्रस्थ परिसरात राहणारा सौरभ शेख बांधकाम कंत्राटदार आहे. मूळचा पश्चिम बंगालचा असलेल्या सौरभने आपली पंधरा वर्षांची पुतणी आणि तिच्या भावाला नोकरीसाठी नालासोपारा येथे आणले होते. पिडीत मुलीचे वडिलांचा मृत्यु झाल्यानंतर तिची आई मोलमजुरी करून तिचा आणि भावाचा उदरनिर्वाह करीत होती. काकाने दोघांना नालासोपारा येथे आणून बांधकाम साईटवर मजूरीवर ठेवले होते. मे महिन्यातील एका बुधवारी संध्याकाळी कामावरून घरी परत येत असताना सौरभने पिडीत मुलीला नालासोपारा रेल्वे स्टेशनजवळील एका लॉजवर नेले. त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. तसेच याची वाच्यता केल्यास तुला व भावाला ठार मारीन अशी धमकी दिली होती. त्यानंतर घरात पिडीत मुलगी एकटी असताना सौरभने तिच्यावर बलात्कार केला होता.यानंतर पंधरा दिवसांपूर्वी सौरभने पिडीत मुलीचे शेजारी राहणाऱ्या माफीज नावाच्या इसमाशी लग्न लावून दिले होते. लग्नानंतर माफिजनेही पिडीतवर वारंवार बलात्कार केला होता. नालासोपारा शहरातील एका समाजसेवकाने पिडीत मुलीची सुटका करून नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर सौरभ आणि माफिजविरोधात बलात्कार, पोस्को, बालविवाह प्रतिबंध अधिनियम, मारहाण, धमकी अशा कलमान्वये गुन्हा दाखल करून सौरभला अटक केली. या घटनेनंतर माफिज फरार झाला आहे. (प्रतिनिधी)
अल्पवयीन पुतणीवर काकाचा बलात्कार
By admin | Updated: July 27, 2016 03:13 IST