पंकज राऊत / बोईसरतारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये चाळीस टक्के पाणी कपात सुरुकेल्यानंतर उद्भवलेली पाणीटंचाई संपुष्टात यावी म्हणून औद्योगिक क्षेत्र परिसरातील ग्रामपंचायतींनी एम्.आय.डी.सी.च्या कार्यालयासमोर सुरु केलेले साखळी उपोषण एम्.आय.डी.सी.च्या अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठ्याबाबत दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यांत आले आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्रात सध्या कार्यान्वित असलेल्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (सी.इ.टी.पी.)ची क्षमता पंचवीस एम्.एल.डी. असून तेथे क्षमतेपेक्षा अतिरीक्त येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते नवापूर समुद्रात सोडले जात असल्याने मच्छिमारी, शेती व आरोग्याला धोका उद्भवत होता. त्याचप्रमाणे पर्यावरणाची हानी होत असल्याने अखिल भारतीय मांगेला समाजाने राष्ट्रीय हरित लवादाकडे त्याबाबत याचिका दाखल केल्यानंतर या सांडपाण्यामध्ये चाळीस टक्के कपात करण्याचे आदेश हरित लवादाने दिल्यानंतर एम्.आय.डी.सी. ने आॅक्टोबरपासून औद्योगिक क्षेत्राच्या पाणीपुरवठ्यात चाळीस टक्के कपात सुरु केली आहे. या पाणीकपातीचा फटका एम्.आय.डी.सी. मधील उद्योगां बरोबरच औद्योगिक क्षेत्र परिसरातील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याला बसला होता. पाण्याअभावी नागरीकांना होणारा प्रचंड त्रास व नागरिकांच्या रोषा मुळे यातून मार्ग काढण्याकरीता मंगळवारपासून बोईसर, सरावली, पास्थळ, सालवड, मान, बेटेगाव, खैरापाडा, पाम, कोलवडे व कुंभवली इ. १६ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी साखळी उपोषणास सुरुवात केली होती.त्यानंतर एम्.आय.डी.सी.च्या कार्यकारी अभियंत्यांनी आंदोलकांशी चर्चा करुन ग्रामपंचायतींना पूर्वीसारखा पाणीपुरवठा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. काल शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख उत्तम पिंंपळे यांनीही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी संपर्क साधून ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनीही सकारात्मक आश्वासन दिले होते.
लेखी आश्वासनामुळे उपोषण मागे
By admin | Updated: November 16, 2016 04:14 IST