अमोल सोटे - आष्टी (श़)केंद्र व राज्य शासनाने विविध योजनांतून शेतकऱ्यांना अनुदानावर सिंचन विहिरी बांधून दिल्या; पण त्या विहिरींवर वीज पुरवठा गत अडीच वर्षांपासून देण्यात आला नाही़ यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे. केवळ आर्वी विभागातील १६ हजार ७६२ शेतकऱ्यांना अद्यापही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे़विद्युत वितरण कंपनीचे आर्वी विभागीय कार्यालय असून आर्वी, आष्टी, कारंजा, खरांगणा व पुलगाव, हे पाच उपविभाग आहे. वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त असल्याने तालुकानिहाय प्रत्येकी १ हजार सिंचन शासनाने विहिरी बांधून दिल्या. सधन शेतकऱ्यांनी स्वत: विहिरीचे बांधकाम केले. या सर्व शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केले. अधीक्षक अभियंता वर्धा व कार्यकारी अभियंता आर्वी यांनी शेतीपंप जोडणीसाठी निविदा मागविल्या़ एप्रिल २०१२ मध्ये हे काम रूद्राणी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळाले़ कंपनीने त्वरित काम सुरू करावे म्हणून वर्क आॅर्डर देण्यात आला; पण जाणीवपुर्वक अद्याप काम सुरू करण्यात आले नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे. खरीप हंगामात वेळेवर पाऊस नसल्याने पिके बुडाली़ सिंचनाला पर्याय म्हणून विहीर आहे; पण वीज पुरवठा नसल्याने त्या शोभेच्या ठरल्यात़ यावर्षी दुबार, तिबार पेरण्या कराव्या लागल्या. पिकांना उन्हाचा तडाखा बसल्याने पिके भुईसपाट झाली. कर्जबाजारी शेतकरी आणखी संकटात सापडला़ यामुळे शेतकरी आत्महत्यांत वाढ होताना दिसते़ या प्रकारामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन करणार असल्याचे सांगितले़ यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देत त्वरित उपाययोजना करून शेतकऱ्यांना वीज जोडणी द्यावी, अशी मागणी होत आहे़
१६ हजार कृषी पंपधारकांना वीज जोडणीची प्रतीक्षा
By admin | Updated: August 27, 2014 23:45 IST