वर्धा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार सहज व सुलभपणे कर्जपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांना दिलेल्या उदीष्टांपैकी केवळ ७६ टक्के कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. यात अत्यल्प कर्जपुरवठा करणाऱ्या सहा बँकांमध्ये असलेला शासकीय निधी काढून शेतकऱ्यांना सुलभपणे कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकेत जमा करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सोमवारी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत खरीप पीक कर्ज वाटप तसेच विविध शासकीय योजनांच्या कर्जपुरवठ्याचा आढावा जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी घेतला, यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा, नाबार्डच्या स्रेहल बन्सोड, अग्रणी जिल्हा प्रबंधक विजय जांगडा, उपजिल्हा निबंधक जे. के. ठाकूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रवीण भालेराव तसेच विविध महामंडळ, बँकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, केव्हीआयसी आदी महामंडळांनी लाभार्थ्यांची निवड करताना बँकतर्फे कर्जासाठी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांच्या केसेस परिपूर्णपणे बँकेत सादर कराव्यात व त्याचा नियमित अहवाल घ्यावा, अशा सूचनाही दिल्यात. बँकांनी सर्व कर्जप्रकरणे स्वीकारावीत, असेही ते म्हणाले. यावेळी प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना अटल पेंशन योजना, सुरक्षा विमा योजना योजनांचाही आढावाही घेण्यात आला. प्रारंभी जिल्हा अग्रणी बँक महाव्यवस्थापक विजय जांगडा यांनी जिल्हातील पतधोरणासंदर्भात तसेच शेतकऱ्यांना खरीप पिक वाटपासंदर्भात माहिती दिली.(प्रतिनिधी)कर्ज वाटपात हयगय करणाऱ्या बँकातून रक्कम काढा- जिल्हाधिकारी ४कर्ज वाटपामध्ये अत्यंत दिरंगाई केल्याबद्दल तसेच जिल्हास्तरीय आढावा बैठकीस अनुपस्थित असलेल्या बँकांच्या प्रतिनिधीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यात देना बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, स्टेट बँक आॅफ हैद्राबाद, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँकेत शासकीय जमा असलेला निधी इतर बँकेत तत्काळ वळविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ४स्टेट बँक आॅफ हैद्राबाद ८ टक्के, इंडियन ओव्हरसीज बँक १० टक्के, एचडीएफसी २७ टक्के, अॅक्सिस २८ टक्के एवढा कमी कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकाबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.अद्यापपर्यंत ४१३.६४ कोटींचे कर्जवाटपं४खरीप पीक कर्ज वाटपासाठी जिल्ह्याला ५४४ कोटी ४९ लक्ष रूपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. ८ आॅगस्टपर्यंत ४१३ कोटी ६४ लक्ष रुपयांचे म्हणजेच ७६ टक्के कर्जवाटप पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ४१ हजार ३६४ शेतकरी खातेदारांना कर्जाचे वाटप पूर्ण झाले आहे. ४अद्यापपर्यंत ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. अशा शेतकऱ्यांची प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत, अशा सूचना करण्यात आल्या. शिवाय शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठीही कर्ज वितरणाचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
‘त्या’ सहा बँकांमधील शासकीय निधी काढणार
By admin | Updated: August 11, 2015 03:06 IST