पुलाजवळ रस्ताच झाला बेपत्ता : डांबरी रस्त्याला येते नाल्याचे स्वरूपसेलू : काहीच दिवसांपूर्वी घोराड ते कोलगाव या रस्त्याची लाखो रुपये खर्च करून निर्मिती करण्यात आली; पण अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था झाली. रस्त्यावरील डांबर बेपत्ता झाले असून खड्डे पडले आहे. यामुळे रस्त्याच्या कामात गैरप्रकार झाल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने असंतोष पसरला आहे. दोन वर्षांपूर्वी ३ किमी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. यानंतर काहीच दिवसांत रस्त्यावरील डांबराचा मुलामा नाहीसा होण्यास सुरूवात झाली. या रस्त्यावर खड्डे पडू लागले. सध्या खड्ड्यांचे स्वरूप मोठे झाल्याने पाणी साचत असल्याचे दिसते. पाऊस सुरू असताना शेतातील पाणी याच रस्त्याने वाहत असल्याने नाल्यापर्यंत पाणी जाते. यामुळे डांबरीकरणाचा रस्ता की नाला, हे कळण्यास मार्ग नाही. आदिवासी गावाला जोडणाऱ्या या रस्त्यासाठी सुमारे ३५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येते; पण अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याच रस्त्यावर एक पूल असून पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता गायब झाला आहे. मागील वर्षीच तेथील रस्त्याची डागडूजी करण्यात आली होती. पुलावरून थोडेही पाणी वाहून गेले की तेथील रस्ता वाहुन जातो. ही बीब नित्याची झाली आहे. घोराड ते कोलगाव हा ५ किमी अंतराचा रस्ता असून ३ किमी अंतराचे नूतनीकरण दोन वर्षांपूर्वीच झाले. अतिवृष्टीतील पिकाची पाहणी करण्यासाठी तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार याच रस्त्याने आले होते. त्यावेळी रात्रभरात सार्वजनिक बांधकाम विभागाने संपूर्ण रस्त्याची दुरूस्ती केली होती. शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीची रस्ता दुरूस्तीच्या नावावर वाट लावली जात आहे. सध्या या रस्त्याला नाल्याचे स्वरूप आल्याने रहदारीच अडचणीत आली आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)
‘त्या’ रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By admin | Updated: August 10, 2015 01:49 IST