हिंगणघाट : येथील नगरपरिषदेचा सन २०१५-१६ चा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. शहराच्या विकासाकरिता ५१ कोटी ५१ लाख ८९ हजार रुपये खर्चाचा संकल्प करण्यात आला. शनिवारी मंजूर झालेल्या या अर्थसंकल्पात शहरवासीयांवर नवा कोणताही कर लादण्यात आला नाही. शिवाय विकासकामांना अधिक चालना देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांनी दिली. शहरवासीयांवर नवीन कराचा भार नसलेल्या या अर्थसंकल्पात अनावश्यक खर्चाला प्रतिबंध घातलेला आहे. जाहिराती, टॅक्सी भाडे, डिझेल कपात आणि अनुत्पादक खर्चाला आळा घातलेला आहे. या अर्थसंकल्पात ९० टक्के कर वसूल करण्यावर भर देण्यात आला आहे. पालिका निधीमधून १ कोटी २५ लक्ष रुपये शहरातील रस्ते व त्यांची सुधारणा करण्यावर खर्च होणार आहे. नाल्या बांधकामाकरिता ७० लक्ष रुपये ठेवण्यात आले आहे. आगामी वर्षात शहराचा सर्वांगीन विकास करणे, स्वच्छ व सुंदर शहर करणे आणि खड्डे विरहित शहर करण्याचा संकल्प आहे. यावर १७ कोटी ८० लाख रुपये ठेवण्यात आले आहे.नगरपालिकेची प्रशासकीय ईमारत बांधकामाकरिता ६ कोटी ५६ लाख १४ हजार रुपये, जलतरण तलाव, शिवाजी पार्क सौंदर्यीकरणाकरिता १ कोटी ९४ लाख २१ हजार रुपये, ज्ञानेश्वर वॉर्ड, तुकडोजी वॉर्ड, इंदिरा गांधी वॉर्ड या भागाकरिता वैशिष्ट्यपुर्ण निधीमधून अविकसीत भागाकरिता ५ कोटी रुपये, दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत अतिरिक्त अनुदान म्हणून ५ करोड रुपयांची तरतुद आहे. नंदोरी चौक ते डॉ. आंबेडकर विद्यालय, कलोडे सभागृह चौक ते नुतन प्रा. शाळा, पिंपळगाव चौक ते झांशी राणी चौक व कृषी उत्पन्न बाजार समिती ते बॉम्बे किराणा स्टोअर्स पर्यंतच्या रस्त्याच्या चौपदरीकरण व आधुनिक विद्युतीकरण करण्याकरिता ३.५ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. अर्थसंकल्प मंजूर करण्याकरिता आयोजित सभेत नगरसेवक अशोक पराते, दशरथ ठाकरे, शुभांगी डोंगरे, अनिल भोंगाडे, माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार यांनी आपले विचार मांडले. यावेळी उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, मुख्याधिकारी अनिल जगताप, लेखापाल ए.डी. मुर्डीव यांनी संपूर्ण नगरसेवकांचे आभार मानले.(तालुका प्रतिनिधी)
नव्या कराचा बोजा नाही
By admin | Updated: March 2, 2015 00:14 IST