चांदेकर : धर्म आणि राजनीती विषयावर प्रवचन कार्यक्रमवर्धा : शासनव्यवस्थेत जितके जास्त कायदे असतील, तितके ते दुर्बलांना जाचक ठरण्याची आणि बलवानांना सशक्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, शासनप्रणाली प्रभावी करण्यासाठी नवनवीन कायदे करण्यापेक्षा शासक आणि प्रशासकांचा दृष्टिकोण बदलण्याची गरज आहे. शासनप्रणाली कोणतीही असो, त्या प्रणालीचे यशापयश प्रणाली कार्यान्वित करणाऱ्या नेतृत्वाच्या दृष्टीवर अवलंबून असते, हे राजनीतीचे मर्म जाणून घेण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पुण्याचे डॉ. शं. भा. चांदेकर यांनी केले. सावंगी (मेघे) येथील साई मंदिर वार्षिकोत्सवात आयोजित ‘धर्म आणि राजनीती’ या विषयावरील प्रवचनात ते बोलत होते. ते म्हणाले, प्राचीन परंपरेत न राज्य होते, न राजा होता. समूहाने स्वीकारलेल्या धर्मप्रणालीनुसार व्यवहार होत असत. काळाच्या गरजेनुसार राज्य, महाराज्य, साम्राज्य, स्वराज्य, भौज्य, सामंतपर्यायी, एकराज्य, गणतंत्र आदी राज्यशासन पद्धती निर्माण झाल्या. मात्र विश्वरूपाची संकल्पना लोप पावल्यामुळे राजा आणि प्रजा असे द्वैत निर्माण आले. आज एकाधिकारशाही आणि लोकशाही या दोनच शासनप्रणाली असून केवळ माझ्या राष्ट्राने जगावे, महासत्ता बनावे, हा संकुचित विचार बळावतो आहे. ‘हे राज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा’ ही शिवरायांसारखी व्यापक दृष्टी लोप पावत चालली आहे. जगातील सर्व राष्ट्रांनी सुखसमाधानाने जगावे, या लोककल्याणकारी दृष्टिकोणाची आज खरी गरज आहे, असेही डॉ. चांदेकर म्हणाले.वार्षिकोत्सवात पहिल्या दिवशी डॉ. चांदेकर यांचे ‘श्रद्धा, अंधश्रद्धा ही विज्ञाननिष्ठा या विषयावर प्रवचन झाले. वैज्ञानिक दृष्टिकोणापेक्षाही विज्ञाननिष्ठा ही महत्वाची आहे. कारण, विज्ञाननिष्ठेत वैज्ञानिक दृष्टिकोण तर आहेच, त्यासोबत मानवी सहृदयता आणि विश्वात्मक संवेदनाही आहेत. धर्मोपदेशक, राज्यकर्ते, शास्त्रज्ञ, समाज सुधारक यांनी ही विज्ञाननिष्ठा अंगिकारली पाहिजे. मुळात भारतीय संस्कृती विज्ञाननिष्ठ होती. कालांतराने पोटार्थी समाजाने यज्ञयाग, कर्मकांड, व्रतवैकल्ये, चातुर्वर्ण्य व्यवस्था, भेदाभेद यात ही विज्ञाननिष्ठा लुप्त केली. ज्यांनी धर्मप्रबोधन करायचे ते अन्यायाचे, शोषणाचे, विषमतेचे समर्थक बनले. याला छेद देण्याचे काम ज्ञानेश्वर, नामदेवांपासून तुकारामांपर्यंतच्या संतपरंपरेने केले. विज्ञाननिष्ठा रूजविताना संतपरंपरेचा मार्ग अवलंबणे, काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक इंगळे यांनी केले.(शहर प्रतिनिधी)
कायद्यापेक्षा दृष्टिकोन बदलण्याची गरज
By admin | Updated: October 22, 2014 23:22 IST