जनजीवन विस्कळीत : निम्न वर्धाचे पुन्हा ३१ ही दरवाजे उघडलेवर्धा : मंगळवारी दुपारपासूनच सुरू झालेल्या पावसाचा तडाखा आर्वी, देवळी आणि कारंजा (घा.) तालुक्याला बसला. त्यामुळे सर्वत्र नद्यांना पूर येऊना अनेक गावांचा संपर्क तुटला. देवळी बस स्थानकावर विद्यार्थ्यांना रात्रीपर्यंत थांबावे लागले. शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले. वर्धा, समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यात मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. मंगळवारी सायंकाळी अचानक धो-धो पाऊस झाल्यामुळे देवळी तालुक्यात सर्वत्र दाणादाण उडाली. यशोदा नदीला पूर आल्यामुळे नांदोरा व डिगडोह येथील शाळकरी विद्यार्थ्यांना रात्री साडेदहा वाजेपर्यंत देवळी बसस्थानकावर अडकून पडावे लागले. काहींना जवळच्या नातेवाईकांनी व शिक्षकांनी घरी नेले. नदी परिसरातील सर्व गावांची शेती खरडून निघाल्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मंगळवारी दुपारनंतर मुळसधार पावसाला पावसाला सुरूवात झाली. तब्बल तीन ते चार तास हा पाऊस एकसारखा सुरू होता. यादरम्यान सायंकाळी ६ वाजेपर्यंत नांदोरा व डिगडोह या दोन्ही गावातील यशोदा नदीला पूर आला. पुलावरून चार फुटपर्यंत पाणी फेकत असल्याने सर्व विद्यार्थी अडकून पडले. रात्री उशिरापर्यंत पूर न ओसरल्यामुळे काही विद्याथ्यांर्च्या निवासाची व भोजनाची सोय सेवाभावी नागरिकांनी केली. रात्री अकरा दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना पुलगाव मार्गे गावी जाणे शक्य होते त्यांना घरी पोहचवून देण्यात आले. नगराध्यक्ष शोभा तडस यांनी विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. तहसील कार्यालयातील अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनीही मदतीचा हात पुढे करण्याची अपेक्षा असताना त्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहे.खैरी गावाचा संपर्क तुटलेलाचआकोली- सेलू तालुक्यात व आकोली महसूल साझात येणाऱ्या खैरी गावाचा सोमवार रात्री १० वाजतापासून संपर्क तुटला असल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी व रूग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. १५०० लोकसंख्येच्या या गावाची कहाणीच जगावेगळी आहे. गावाच्या मागे मदन उन्नयी धरण तर पुढे बेफाम वाहणारी धामनदी. नदीवरील ठेंगणा पुल व त्यातच महाकाळी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे थोड्याही पावसाने या पुलावरून पाणी वाहते. तीन दिवसांपासून या पुलावर पाणी असल्याने विद्यार्थी शिक्षणासाठी जाऊ शकले नाही. काही घरात तापाने रूग्ण फणफणत आहे. पण दवाखान्यात नेणार कसे हा प्रश्न आहे. गरोदर महिलांचा जीव तर अक्षरश: टांगणीला लागला आहे. दूध विक्रेत्यांना चंदीवर दूध पोहचता करता येत नाही. ग्रामसेवक, तलाठी पुलापर्यंत येतात व निघून जातात. पूल उंच करण्याकरिता शासनदरबारी प्रयत्न झाला. परंतु लोकप्रतिनिधींची आश्वासने फोल ठरली. त्यामुळे आता तरी प्रशासनाने या गावाला असलेला धोका ओळखून पूल उंच करण्याची मागणी होत आहे. तहसीलदार रवींद्र होळी यांनी पूरस्थळाची पाहणी केली.
पुरामुळे विद्यार्थी देवळी बसस्थानकावर अडकले
By admin | Updated: August 13, 2015 02:44 IST