शब्दांचा गोडवा हरवतोय : सांकेतिक चिन्हांमुळे शब्दांचे महत्त्व झाले कमीपराग मगर वर्धाजग विस्तारलं तसतशी संवादाची माध्यमेही वाढली. हरवलेला संवाद पुन्हा सुरू झाला असे सर्वांना वाटू लागले. पण सोशल मीडियावर बोलक्या शब्दांची जागा या काही वर्षात चित्रांनी घेतली. त्यामुळे संवादामध्ये शब्दांपेक्षा चित्र आणि सांकेतिक चिन्हांचाच वापर जास्त होत असल्याचे संक्रांतीला व्हॉट्स अॅप आणि इतरही माध्यमांवर झळकत असलेल्या चित्रमय संदेशावरून प्रत्ययास येते. हजार शब्द सांगण्याची किमया एका चित्रामध्ये असते असे मानले जाते. पण शब्दांचे महत्त्व त्यामुळे कमी होत नाही. पूर्वी कुणालाही शुभेच्छा देताना भारदस्त अशा साहित्यिक शब्दांचा प्रयोग केला जायचा. प्रतिक्रिया देतानाही योग्य आणि चपखल बसणारे शब्द वापरले जायचे. त्यातच संक्रांत हा सर्व सणांमधला गोड सण. ‘तिळगुळ घा आणि गोड गोड बोला’ असे केवळ मराठीतच ऐकावयास मिळते. हे शब्द आप्तेष्टांच्या गोड आवाजात फोनवरून ऐकतानाही पूर्वी वेगळेच समाधान होते. पण या काही वर्षात अश्या संवादाची जागा शाब्दिक संदेशांनी घेतली. त्यातही पुढे जाऊन शब्द कमी होत त्याची जागा चित्र आणि सांकेतिक प्रतिमांनी घेतली. फोनवरील संवादाने स्पर्शाचा ओलाव कमी झालाच पण चित्रांनी शब्दांचा होता तेवढाही ओलावा कोरडा केला आहे. त्यामुळे आधी संक्रांतीला तिळगुळ घा आणि गोड गोड बोला असे ऐकायला मिळणारे शब्द आता चित्रांमध्ये जाऊन बसले आहे. या शब्दांची जागा आता तिळगुळाचे लाडू असलेल्या चित्रांनी घेतली आहे. व्हॉट्स अॅप वर तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या चित्ररूपी तिळाच्या लाडूंवरून हेच दिसून येत आहे.
शब्दरूपी संवादाचे गोड माध्यम झाले चित्रमय
By admin | Updated: January 16, 2016 02:31 IST