बीएस ३ इंजिनची वाहने विक्री बंदच्या निर्णयाने दुचाकींच्या शोरूममध्ये गर्दी वर्धा : प्रदूषणावर आळा बसविण्याचा उद्देश ठेवत न्यायालयाने बीएस ३ इंजिन असलेली वाहनांची विक्री आणि नोंदणी ३१ मार्चच्या सायंकाळपासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय होताच विविध कंपन्यांनी सदर इंजिन असलेल्या दुचाकींवर मोठ्या प्रमाणात सुट देत त्या विक्रीचा सपाटा सुरू केला. सवलतीची माहिती मिळताच नागरिकांनी विविध कंपन्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये गर्दी केली. वर्धेत शुक्रवारी सायंकाळपर्यंत ५२५ दुचाकींची विक्री झाल्याची माहिती असून नोंदणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. न्यायालयाच्या निर्णयानुसार अशा वाहनांची आज केवळ विक्रीच नाही त्याची तर नोंदणीही करणे बंधनकारक आहे. १ एप्रिलपासून या वाहनांची विक्री अथवा त्याची नोंदणी होणार नाही, अशा सूचना न्यायालयाच्या आहेत. हा निर्णय जाहीर होताच डिलरकडे असलेल्या दुचाकी कंपनीने परत घेण्याकरिता नकार दिल्याने डिलरला ही वाहने विकणे बंधनकारक झाले. यामुळे वर्धेतील विविध कंपनीच्या शोरूमधील कर्मचाऱ्यांची ग्राहक सांभाळताना आणि त्यांच्या नोंदणीकरिता चांगलीच धावपळ दिसली. वर्धेत दुचाकींच्या एकूण १४ शोरूम वर्धा : वर्धेत विविध कंपनीचे एकूण १४ शोरूम आहेत. यात काही कंपनीचे दोन तर तीन शोरूमचा समावेश आहे. या शोरूमध्ये गुडीपाडव्याचा मुहूर्त साधत मोठ्या प्रमाणात वाहनांची मागणी करण्यात आली होती. डिलरच्या मागणीनुसार कंपनीने वाहनांचा साठा पाठविला. यातच गुडीपाडवा होताच न्यायालयाने बी ३ इंजिन असलेल्या गाड्यांमुळे प्रदुषणात होत असलेली वाढ कायम राहत असल्याचे म्हणत या गाड्या विक्रीवर बंदी आणली. यामुळे घाऊक व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या निर्णयामुळे त्यांनी या गाड्या सुट देत विकण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक कंपनीच्या गाड्यांवर कमी अधिक रुपयांची सूट असल्याचे दिसून आले. मोपेडवर सहा ते सात हजार तर बाईकवर सात ते आठ हजार रुपयांची सूट असल्याचे दिसून आले. यामुळे बऱ्याच नागरिकांनी वाहनांची खरेदी केली.(प्रतिनिधी) ३० कारची विक्री न्यायालयाच्या निर्णयाने दोनचाकीच नाही तर चारचाकी वाहनांवरही बंदी आली. या बंदीचा लाभ उचलत वर्धेत तब्बल ३० चारचाही वाहनांची विक्री झाल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन विभागाने दिली. बीएस एक प्रदूषणाचे मानक बीएस म्हणजे भारत स्टॅडर्ड स्टेज इंजिनाच्या अंतर्गत वाहनामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या नियमनासाठी केंद्र शासनाने दिलेले हे एक मानक होय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे त्यावर नियंत्रण ठेवते. बीएस मानक ही भारतात कार्यरत आहे. यानुसार वाहनांच्या इंजिनचा दर्जा ठरविल्या जातो. या दर्जानुसार भारतातील वाहने बीएस ३ इंजिनची आहेत. या वाहनांमुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे समोर आले आहे. वाहनाच्या इंजिनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याकरिता बीएस मानांकनात वेळोवळी सुधारणा करण्यात येते. ही सुधारणा करण्याकरिताच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
वर्धेत ५२५ दुचाकींची विक्री
By admin | Updated: April 1, 2017 00:59 IST