वर्धा : विविध परिवर्तनवादी पुरोगामी संस्था, संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविला़ प्रतिगामी व सनातनी प्रवृत्तीच्या हस्तकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याविरूद्ध निदर्शने करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले़विविध संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंगळवारी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन क्रॉम्रेड गोविंद पानसरे व उमा पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत निषेधाच्या घोषणा दिल्या़ यामुळे निदर्शनेही करण्यात आली़ यानंतर मूकमोर्चा काढून महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत जाऊन तेथे निषेध सभा घेण्यात आली़ यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून निषेध व्यक्त केला़ यावेळी नई तालिमच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत निषेध नोंदविला़ कामगार नेते राजू गोरडे महाराष्ट्र अंनिसचे गजेंद्र सुरकार, डॉ. सिद्धार्थ बुटले, नई तालिमचे डॉ. सुमन बरंठ, भास्कर इथापे, नितीन झाडे, प्रा. शेख हाशम, प्रा. नूतन माळवी, अतुल शर्मा, डॉ. सुभाष खंडारे, निर्माण फाऊंडेनशनचे अमीर अजानी, अविनाश काकडे, डॉ. चेतना खडसे, नरेंद्र कांबळे, मयूर राऊत, सुधाकर मिसाळ, राजेंद्र ढोबळे, दीपक बारापात्रे, अनिल मुरडीव, श्रीकृष्ण धोटे आदींनी मनोगत व्यक्त करून निषेध नोंदविला़(कार्यालय प्रतिनिधी)माकपानेही मूकमोर्चा काढून केली घटनेची निंदाराज्यातील ज्येष्ठ कम्यूनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावर सोमवारी कोल्हापूर शहरात अज्ञात गुन्हेगारांनी पिस्तुलाने गोळ्या झाडल्या़ यात पानसरे दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून ते मृत्यूशी झुंज देत आहे. हा हल्ला पुरोगामी विचार मांडणाऱ्या शक्तीवरील हल्ला असल्याचे सांगत मार्कस्वादी कम्यूनिस्ट पक्षाद्वारे बुधवारी दुपारी मूकमोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला़ यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत हल्लेखोरांचा तपास करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली़पानसरे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, दलितांवरील अत्याचार, शेतकरी प्रश्न, विविध सामाजिक प्रश्नांवर आंदोलने करून अनेक पुस्तकांचे लिखान केले. वयाच्या ८२ व्या वर्षी एक ज्येष्ठ कम्युनिष्ट नेता, समाजसुधारक व त्यांच्या पत्नीवर हल्ला व्हावा ही गंभीर बाब आहे. महाराष्ट्र अंनिसचे डॉ़ दाभोळकर यांचीही याच पद्धतीने हत्या झाली. यामुळे राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंड अराजक शक्तींचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ या हल्ल्याचा माकपाच्यावतीने तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला़
‘त्या’ भ्याड हल्ल्याचा परिवर्तनवादी संघटनांतर्फे निषेध
By admin | Updated: February 19, 2015 01:25 IST