वर्धा : बोरधरण येथे मित्रासह गेलेल्या एका आदिवासी युवतीचा सेलू पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाने विनयभंग केला. या प्रकरणात युवतीच्या तक्रारीरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक राजू चौधरी फरार झाला. तो फरार झाला नसून त्याला पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फरार होण्यास मदत केली, अशी धक्कादायक माहिती पोलीस सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली. सदर पोलीस उपनिरीक्षकाला वर्धा पोलीस अधिकाऱ्यांचेच पाठबळ असल्याची चर्चाही रंगत आहे. गुन्हा दाखल असलेला हा पोलीस उपनिरीक्षक अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहेत. तक्रार दाखल करण्याच्या दिवशी पसार झालेला हा पोलीस अधिकारी सेलू शहरात असल्याचे त्याच्या मोबाईलच्या लोकेनशनवरून दिसत असताना पोलिसांनी त्याला अटक करण्याची कारवाई का केली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. आरोपी असलेल्या सदर पोलीस अधिकाऱ्याला बाहेर राहून अटकपूर्व जामीन मिळविण्याकरिताच ही मुभा जाणिवपूर्वक देण्यात आली, असावी, असेही सूत्राचे म्हणणे आहे. साधारणत: तक्रार दाखल करण्याकरिता एका तासाचा कालावधी पुरेसा असतो. असे असताना या प्रकरणात मात्र तक्रार दाखल करण्याकरिता तब्बल साडेचार तासांचा कालावधी लावण्यात आला हे विशेष. शिवाय या प्रकरणात पहिले दाखल करण्यात आलेली तक्रार रद्द करण्यात आली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांच्या उपस्थितीत तक्रार नोंदविण्यात आली. यावेळी राजू चौधरी सेलू ठाण्यात हजर होता, असेही सूत्राने सांगितले. शिवाय गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री येथील एका पोलीस अधिकाऱ्याने चौधरीच्या भ्रमणध्वनीवर माहिती दिल्यानंतर तो पसार झाल्याची माहितीही पोलीस सूत्राने दिली. यावेळी मात्र त्याच्या सोबत असलेला सहआरोपी निलेश मेश्राम याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. चौधरी फरार होण्यामागे अधिकाऱ्यांची भुमिका महत्त्वाची असून त्याचे खापर केवळ कर्मचाऱ्यांवर फोडण्यात येत असल्याचीही चर्चा सेलू ठाण्याच्या आवारात होत आहे. या प्रकरणाबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने तपास अधिकाऱ्याला भ्रमणध्वनीवरुन तपासाची माहिती मागितली असता सदर अधिकाऱ्याने काही क्षणातच पीडित मुलीच्या पित्याशी संपर्क साधून वृत्ताकडे तक्रार दिली असेल, परत घेण्यासाठी दबाव टाकल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)
पोलीस उपनिरीक्षकाला वरिष्ठांचे पाठबळ
By admin | Updated: June 24, 2015 02:12 IST