अंकीत गोयल : नागरिकांनी कायदा पाळत ध्वनीप्रदूषण टाळावे वर्धा : उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिलेल्या निकालानुसार ध्वनी प्रदूषण हा गुन्हा आहे. कायद्याचे उल्लघन केल्यास सदर व्यक्तीला पाच वर्षे करावासाची शिक्षा होवू शकते, त्यामुळे दिवाळी, नाताळ आणि नववर्षचा उत्सव साजरा करताना नागरिकांनी ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.सध्या दिवाळीसाठी आवाजाचे फटाके घेण्यासाठी नागरिक उत्सुक असतात, तसेच अशा उत्सवादरम्यान ढोल, ताशे वाद्य, डिजे तसेच ध्वनीक्षेपकाचा वापर केला जातो. असे उत्सव साजरे करताना ध्वनी प्रदूषण होवून त्याचा इतरांना त्रास होवून आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण ) नियम २००० नुसार पर्यावरण सुरक्षा अधिनियमचे कलम १५ व १९ नुसार गुन्हा असून या कायद्याचा भंग केल्यास संबंधितास ५ वर्षे कारावासाची शिक्षा व एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. सदर कायद्यानुसार धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा आवाज मर्यादित ठेवण्याचे बंधन आहेत, ते क्षेत्र असे आहे.शांतता क्षेत्र (दवाखाने, मंदिर, मस्जिद, शाळा, महाविद्यालये इत्यादी) दिवसा आवाज ५० डेसिबल व रात्री ४० डेसिबल रहायला हवा. निवासी क्षेत्र (लोकांचे राहण्याचे ठिकाण, लोकवस्ती वगैरे) दिवसा ५५ डेसिबल व रात्री ४५ डेसिबल वाणिज्य क्षेत्र (आठवडी बाजार व बाजार लाईन वगैरे) दिवसा ६५ डेसिबल व रात्री ५५ डेसिबल, औद्योगिक क्षेत्र (उत्पादन क्षेत्र, कारखाशने) दिवसा ७५ डेसिबल व रात्री ७० डेसिबल इतकी मर्यादा आहे.त्या त्या क्षेत्रात मर्यादित आवाजापेक्षा जास्त ध्वनी प्रदूषण झाल्यास पर्यावरण सुरक्षा अधिनियमाचा भंग होतो. त्यामुळे नागरिकांनी आवाजाच्या तिव्रतेबाबात खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.(प्रतिनिधी)
ध्वनीप्रदूषण करणाऱ्यावर कारवाईचा बडगा
By admin | Updated: October 29, 2016 00:51 IST