श्यामकांत उमक खरांगणा(मो.)भारतासारख्या कृषिप्रधान देशात नववर्षानुसार शेतीच्या कामकाजाची सुरूवात गुढीपाडव्याला केली जाते. महाराष्ट्रासह जिल्ह्यातही गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान शेतातील अवजारांची तसेच बैलांचीही पूजा केली जाते. याला ग्रामीण भागात सांजोणी प्रथा असे संबोधले जाते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि विचारसरणीच्या काळात ही प्रथा लोप पावत चालली आहे. गुढीपाडवा हा मराठी लोकांचा नववर्षदिन म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडवा ते रामनवमी उत्सवापर्यंत शेतकरी कुटुंब, सालकरी नवीन वर्ष शेतीसाठी सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावो म्हणून गुढी तोरणे उभारतात. शेतीची अवजारे मशागतीसाठी सज्ज करून ठेवतात. बैलांना आंधोळ घालून त्यांना झूल, बाशिंग, घुंगरमाळी घालून सजवितात. रामनवमीपर्यंत हा उत्सव चालतो. याला जिल्ह्यात ग्रामीण भागात सांजोणी प्रथा असे संबोधले जाते. पहिल्या उन्हाळवाहीची सुरूवात करताना उपयोगात येणारे वखर, नांगर फाळ, फास लाऊन तयार ठेवले जातात. घरची गृहिणी नैवद्य म्हणून नवीन गव्हाच्या पोळ्या, मुंग दाळीच्या वड्याची भाजी, सेवया, दहीभात, दुध, तूप, गुळ असे साहित्य शिदोरीसोबत बांधून देते. शेतमालक कुटुंबातील इतर पुरूषमंडळी नोकरचाकर यांना घेऊन साहित्यनिशी शेतावर जातो. तिथे भूमातेची, औजारांची बैलांची पूजा करून नैवद्य दाखविला जातो. शेतशिवारातील देवदेवतांचीही पूजा केली जाते. दहीभात सर्वत्र शिंपडल्या जातो व शेत नांगरणी किंवा वखरणीची सुरूवात केल्या जाते. मुहूर्त म्हणून ओळ दोन ओळीची जागा नांगरणी केल्यानंतर बैलांना वैरण पाणी देऊन सर्व मंडळी गोलाकार बसून नैवद्य म्हणून आलेल्या शिदोरीची न्याहारी करतात. गृहलक्ष्मी पोळ्याच्या दिवसाप्रमाणे बैल, औजारे व शेतातून आलेल्या सर्वांना ओवाळते. आपापल्या सोयीनुसार रामनवमीपर्यंत हा उत्सव चालतो. आधी संपूर्ण जिल्ह्यात ही सांजोणी प्रथा मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने पालली जात आहे. परंतु आता मात्र गुढीपाडव्याला केवळ शेतात मुगाच्या दाळीचे चार दाणे फेकून शेतकरी घरी परत येतात. तसेच आधी या सणाला केला जाणारा बैलाचा व शेतीचा मानही आता कमी होत ही प्रथाच लुप्त होत चालली आहे.
सांजोणी’ प्रथा जातेय काळाच्या पडद्याआड
By admin | Updated: March 26, 2015 01:42 IST