पुलगाव : शहरात गत काही दिवसांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे. या रोगामुळे शहरात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील केरकचरा उचलणे, नाल्यासफाई सोबतच जनजागृतीचे अभियान सुरू करण्याची माहिती मुख्याधिकारी राजेश भगत यांनी पत्रकार परिषदेत दिली. डेंग्यू आजारामुळे नुकातेच दोन बालके दगावली. आजाराचे रुग्णात सतत वाढ होत आहे. त्यामुळे आजार होण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे, घराभोवती पाण्याचे टाकी, फुलदाणी, फ्रिज, कुलर नारळाच्या करवंट्या याची स्वच्छता ठेवणे, कोरडा दिवस पाळणे, तापाची लक्षणे आढळताच शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचे सांगण्यात आले. पालिकेने जनजागृतीसाठी पत्रके छापली आहेत. ५० विद्यार्थ्यांची टीम तयार करून नगरसेवक, शिक्षकांच्या नेतृत्वात घरोघरी पत्रकांचे वाटप, रिक्षाद्वारा लाकुडस्पिकर फिरवून, फॅक्स, बोर्ड, केबलच्या माध्यमातून जनजागृती तसेच प्रत्येक वार्डात नगरसेवक साफसफाईवर लक्ष देणार आहेत. परिषदेकडे पाच फॉगिंग मशिन असून नव्याने दोन मागवल्या असून धुरळणी सुरू असल्याचे नगराध्यक्ष मनीष साहू यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष साहू यांच्यासह सभापती स्मिता चव्हाण, मनोज वसू, सुभाष लुंकड, माजी नगराध्यक्ष भगवान ठाकूर, मंजू बत्रा, मौला शरीफ उपस्थित होते.(तालुका/शहर प्रतिनिधी)
डेंग्यूविरूद्ध पालिकेचे अभियान
By admin | Updated: September 9, 2014 23:54 IST