ंजलयुक्त शिवार : ६८२ कामांना ११.१६ कोटींचा निधी मंजूर, २८२ कामे झालीत पूर्ण प्रशांत हेलोंडे वर्धा सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी तथा भूजल पातळी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत कृषी विभागासह वन विभागामार्फतही ही कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. या कामांमुळे वनक्षेत्रात सर्वाधिक जलसंधारण होत असल्याचे पाहावयास मिळते. वन विभागाच्या ६८२ कामांना शासनाकडून मंजुरी मिळाली असून ११.१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जंगल भागात होणारी कामे मानवासह प्राणी, पक्ष्यांसाठी तथा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जातात. यामुळे राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियानात कृषी विभाग, अन्य संस्थांसह वन विभागाकडेही विविध कामे सोपविण्यात आली आहेत. वन संवर्धन व संरक्षणासोबतच वन विभागाद्वारे जलयुक्त शिवार अभियानात जलसाठा वाढविण्याचे कामही केले जात आहे. वन विभागाकडून ढाळीचे बांध, नाला खोलीकरण, दगडी बांध या कामांसह पाणी साठवणूक तलावांची निर्मिती केली जात आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणात जलसंचय होत असून भूजल पातळी वाढत असल्याचे समोर आले आहे. वन विभागाकरिता ६८२ कामे मंजूर असून . यासाठी ११ कोटी १६ लाख ३४ हजार रुपयांच्या निधीची तरतूदही आहे. यातील वन विभागाकडून आतापर्यंत २८२ कामे पूर्ण केली आहेत. या कामांवर ३ कोटी ५५ लाख २० हजार रुपयांचा खर्च झाला आहे. या माध्यमातून जंगल क्षेत्रातील पाणी साठवणूक वाढली असून वन्य प्राणी, पक्ष्यांच्या पाण्याची सोय झाली आहे. वनक्षेत्रात घनदात वृक्षवेली राहत असल्याने त्या भागात पाणी जमिनीत मुरते. या क्षेत्रात पाणी साठवणूक तलाव व खोल-समतल चर केल्याने वाहून जाणारे पाणी अडते व भूजल पातळीत लक्षनिय वाढ होते. वन विभागाची आणखी ३२४ कामे प्रगतिपथावर आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर जलयुक्त शिवारमुळे वन क्षेत्रातील जलसंचय वाढून पर्यायाने लगतच्या शेतजमिनींनाही फायदाच होणार आहे. जंगल भागालगतच्या गावांतील विहिरींची पातळी वाढल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. जंगलांतील पाणीटंचाई होणार दूर जंगल क्षेत्रामध्ये नदी, नाले नसले तरी पाणीटंचाई निर्माण होते. परिणामी, वन विभागाला कृत्रिम पाणवठे निर्माण करून त्यात टँकरद्वारे पाणी टाकावे लागते. प्रसंगी विंधनविहिरींचे खोदकाम करावे लागते. जलयुक्त शिवार अभियानात बऱ्यापैकी जलसंचय झाला आहे. यामुळे जंगलातील पाणीटंचाई दूर होणार असून सिंचन क्षमतेतही वाढ होणार आहे.
वनक्षेत्रात होते सर्वाधिक जलसंधारण
By admin | Updated: April 2, 2017 00:43 IST