सोहम पंड्या : बा.दे. अभियांत्रिकीमध्ये राष्ट्रीयस्तरीय टेक्नॉवेन्झा मॉडेल मेकिंग स्पर्धा वर्धा : देशाचा कणा शेतीक्षेत्र आहे. सुमारे ७० टक्के जनतेची उपजीविका शेतीवर आहे. अद्यावत तंत्रज्ञानाने उत्तुंग झेप घेतली आहे. सर्व क्षेत्रात अगदी तळागाळापर्यंत तंत्रज्ञान पोहोचले. तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्र विस्तारत असताना शेतीक्षेत्र मागे राहता कामा नये. अद्यावत तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचले पाहिजे. एवढ्यावरच न थांबता तंत्रज्ञानाचे भरीव योगदान शेतीसाठी असले पाहिजे. शेतीपयोगी तंत्रज्ञान विकसित झाले तर शेतीक्षेत्र प्रगत होईल. शेतकरी बांधवांची प्रगती होईल, असे मत ग्रामपयोगी विज्ञान केंद्र दत्तपूरचे संचालक डॉ. सोहम पंड्या यांनी व्यक्त केले. सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महा.मध्ये आयोजित राष्ट्रीयस्तरीय टेक्नॉवेन्झा मॉडेल मेकिंग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. एम.ए. गायकवाड, डॉ. डी.आर. दांडेकर, टेक्नॉवेन्झाचे समन्वयक प्रा. आर.डी. कदम, प्रा. स्वप्नील धांदे, प्रा. हिंगणीकर उपस्थित होते. डॉ. पंड्या पूढे म्हणाले की, टेक्नॉवेन्झाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता निर्माण होते. नवनिर्मितीची बिजे येथूनच रोवली जातात. समाज व राष्ट्रपयोगी हित जोपासून अधिक संशोधन व्हावे. अभियंत्यांकडून हिच अपेक्षा असते. क्रिएटिव्हीटी महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांनी त्याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करून नवीन संकल्पना, तंत्रज्ञान रूजविण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या मॉडेलमधून त्यांची संशोधनवृत्ती दिसत असल्याचे सांगितले. टेक्नॉवेन्झामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नवनिर्मितीला दिशा देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संयोजक प्रा. कदम यांनी दहा वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम बदलत्या तंत्रज्ञानाला आयाम देणारा असून विद्यार्थ्यांत सृजनशिलता, संशोधनवृत्ती निर्माण करणारा आहे, असे सांगितले. ही स्पर्धा मेगा व मिनी प्रोजेक्ट दोन गटात घेण्यात आली तर सर्कीट मेकींग स्पर्धाही झाली. यानंतर उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टची पाहणी करीत त्यांचे कौतुक केले. मेगा प्रोजेक्ट गटात इइइ ग्रुपमध्ये पराग नेवारे, रूपाली राणे, पायल दरणे, ऋतुजा कदारे, रोहीत ठावकार, सुयश भुसारी, योगेश पांडे, अक्षय रोकडे यांनी तयार केलेल्या ‘नोवेल टेक्नॉलॉजी आॅफ इफेक्टीव्ह फॉरमिंग सोलर पॅनल’ या प्रोजेक्टने प्रथम पुरस्कार प्राप्त केला. सीएसआयटी ग्रुपमध्ये ‘अटेन्डस ट्रेकींग अॅण्ड मोनेटरिंग सिस्टम युजिंग वाय फाय’ हा प्रोजेक्ट तयार करणारे आकाश झाडे, प्रतिक ठाकरे, स्वर झालटे, स्रेहल नानोटे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. मिनी प्रोजेक्ट इ.इ. ग्रुपमध्ये ‘लायब्ररी मॉनेटरिंग सिस्टम’ तर सीएसआयटी ग्रुपमध्ये ‘पॅरालेल थॅर्मल स्टेबॅलिटी इंटर लॉकिंग युजिंग इंटरनेट आॅफ थिंग्ज’ हा प्रोजेक्ट प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. सर्कीट मेकींगमध्ये पंकज दारपुरे, प्रितम इखार या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेचे परिक्षण, प्रा. इंदुरकर, प्रा. भिंगरे, प्रा. मांडवगणे, डॉ. दांडेकर, प्रा. ठाकरे, प्रा. धांदे, प्रा. श्रीवास्तव, डॉ. इंगळे, प्रा. सायंकार, प्रा. वारकर, प्रा. दगडकर, प्रा. भावरकर, प्रा. बागडे, प्रा. खत्री, प्रा. बोबडे, प्रा. कोरडे, प्रा. सदावर्ते, प्रा. झिलपे, प्रा. बोबडे, प्रा. गावंडे आदींनी केले.(कार्यालय प्रतिनिधी)
शेतीपयोगी तंत्रज्ञान विकसित होणे गरजेचे
By admin | Updated: April 2, 2017 00:50 IST