पुलगाव घाटाजवळ धाडसत्र : प्रत्येक ट्रकवर ४० हजारांचा दंड देवळी : पुलगाव येथील वर्धा नदीच्या घाटाजवळ महसूल प्रशासनाने धाडसत्र राबवून रेतीचे १३ ट्रक जप्त केले आहे. प्रत्येकी दोन ब्रास याप्रमाणे १३ ट्रकमधील २६ ब्रास रेती जप्त करून सर्व ट्रक देवळीच्या तहसील कार्यालयात लावण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी करण्यात आली असतानाही रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल दाखल झालेला नव्हता.गौण खनिजाची चोरी करून रेतीची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याच्या माहितीवरून देवळीचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार बाळू भागवत, नायब तहसीलदार वरपे, पटवारी व्ही.आर. झाडे, जे.एम. बुरांडे, के.एस. बुडगे यांच्या चमूने सापळा रचून ही कारवाई केली. अधिकाऱ्यांची ही चमू पुलगावच्या रेती घाटाजवळ दबा धरून बसले असता रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या या १३ ट्रकवर कारवाई करण्यात आली.या कारवाईत एमएच ३४ ए ६९७९, एमएच ३४ एम ४१, एमएच २७ एक्स ५१२५, एमएच ३० एल १११०, एमपी १०४, जीए ०२२४, एमएच २७ एक्स १९७०, एमटी ४- ८३२१, एमएच ०४-सीयु ७४९६, एमएच २७ एक्स २०२३, एमएच ३० ए ९१५२, एमएच २७ एक्स ५८२९, एमडब्ल्यूवाय ७७०६, एमएच २७ एक्स ५८६३ आदी ट्रकचा समावेश आहे. ही कारवाई आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास करण्यात आली. प्रत्येक ट्रकमधील दोन ब्रास रेती मागे आठ हजार व त्याचे पाचपट अशा पद्धतीने प्रत्येकी ट्रकमागे ४० हजार रुपयांचा दंड आकारून उपविभागीय अधिकाऱ्याच्या निर्देशावरून पोलीस कारवाई सुद्धा करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार बाळू भागवत यांनी दिली. त्यामुळे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात कारवाई करण्यात आली नव्हती. पुलगाव येथे रेती माफियांची साखळी कार्यरत असल्याने याठिकाणी रेती चोरीचे प्रमाण नित्याचेच झाले आहे. ‘जिसकी जीतनी भागीदारी’ या तत्वानुसार १५ ते २० ठेकेदारांची टोळी एकत्र येवून मोठ्या रकमेचे ठेके घेतले जात आहे. नदीपलिकडे यवतमाळ जिल्ह्यात ठेके घेऊन वर्धा जिल्ह्यातील रेतीची चोरी केली जात आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांच्या महसुलला चुना लावला जात आहे.(प्रतिनिधी) पोलीस कारवाईकरिता विलंबामुळे अनेक संशय महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही कारवाई केली. असे असताना रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात कारवाई का करण्यात आली नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. पुलगावात रेती माफीयाचे मोठे जाळ असून कोट्यवधीचा काळा व्यवहार चालतो. याच आर्थिक व्यवहाराकरिता हा विलब होत असल्याचा संशय येथे बळावत असल्याची चर्चा आहे. रेती घाटावरील नाही ठिय्यावरील? महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेली ही रेती वर्धा नदी घटावरील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही रेती येथे लावण्यात आलेल्या ठिय्यावरील असल्याची चर्चा परिसरात आहे. जर खरच ही रेती ठिय्यांवरील असेल तर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईचे स्थळ बदलविण्यामागचे कारण काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रेतीची अवैध वाहतूक; १३ ट्रकवर कारवाई
By admin | Updated: October 29, 2016 00:27 IST